भाजपची 'सौ पार'ची हॅट्रीक; गेल्या वर्षभरात फडणवीसांनी नेमकी कोणती जादू केली..? 'हे' आहेत महत्त्वाचे
Lookback 2024- लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट समजावून घेत गेल्या सहा महिन्यांत भाजपने मायक्रो प्लॅनिंग करत महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली. मी पुन्हा येईल म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेच, पण स्वतःतील नेतृत्तवगुणांना त्यांनी नव्याने झळाळीही दिली. शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडण्यास फडणवीस हेच जबाबदार आहेत, असं बोललं गेलं. सत्तेसाठीच भाजपने हा खेळ केल्याचा आरोपही झाला. मात्र तरीही फडणवीसांनी भाजपला एकहाती बहुमताच्या जवळ नेत सलग तिसऱ्या विधानसभेत सेंच्यूरी करुन दाखवली.

सलग तीन टर्ममध्ये शंभरीपार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने ही तिसरी निवडणूक लढवली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही टर्ममध्ये भाजपला स्प्ष्ट बहुमत मिळाले. 2014 मध्ये भाजपला 123 जागा, 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये 132 पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय झाला. यंदाच्या विधानसभा विजयानंतर भाजपने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे सलग तीन वेळा भाजपाला शंभरीपार नेण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जमलेला नाही. त्यामुळे फडणवीस यांचे हे यश महत्वाचे मानले गेले.
पंधरा वर्षात अनेक चढउतार
देवेंद्र फडणवीस 2014 ला राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र पुढच्याच टर्ममध्ये म्हणजे 2019 ला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यानंतर फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारी देत स्वत:तला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रापुढे आणलं. पुन्हा राजकीय समीकरणे जुळवून आणत आणि दोन पक्षात फूट पाडून राज्यात महायुतीचे सरकार आणले. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले होते. त्यानुसार त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एकसंघ बांधण्याचा प्रयत्न केला.
लोकसभेतून घेतला धडा
गेल्या लोकसभेला भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे सच्चे कार्यकर्ते खचले होते. अशा परिस्थितीतही केंद्रीय नेतृत्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा यांचे सर्व अधिकार फडणवीसांना देत, त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. पक्षनेतृत्वाच्या या संधीचे सोनं करुन दाखवत देवेंद्र फडणवीसांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. आजच्या निकालामुळे पुन्हा एकदा भाजपचं राज्यातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून आले.
भाजपचे मायक्रो प्लॅनिंग ठरले महत्त्वाचे
गेल्या वर्षभरात भाजपने मायक्रो प्लॅनिंगवर भर देत निवडणूक कशी लढवायची, याचा परिपाठच मांडला. महिला, आदिवासी आणि इतर घटकांसाठी राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा आलेख मांडला. उमेदवारांकडे अधिक लक्ष देत स्थानिक पातळीवरील पक्षांतील वैचारिक मतभेद दूर करून तळागाळापर्यंतच्या कमळ पोहचविण्याचे काम करण्यात आले. 'लाडकी बहिण' सारखी योजना या निवडणुकीत टर्निंग पाँईंट ठरली. दुसरा मोठा घटक म्हणजे इतर मागास जातींचे एकत्रीकरण. भाजपने ओबीसींमधील विविध जाती समूहांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत विरोधकांनी वापरलेलेल संविधान बदलचे नॅरेटिव्ह व्यवस्थित हाताळले. उत्तर महाराष्ट्रातील कांदा आणि विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.












Click it and Unblock the Notifications