पटोलेंना घेरण्याचा भाजपचा प्लॅन, साकोलीतील जातीय समिकरण ठरणार काँग्रेसची डोकेदुखी
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. पटोले हे याच साकोली गावचे असल्याने हा महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल मतदारसंघ समजला जातो. पटोले यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले परिणय फुके हे विधान परिषदेवर निवडून गेल्याने भाजप त्यांच्या जागी नवा चेहरा शोधत असल्याच्या सध्या चर्चा आहेत.
वेगवेगळ्या पक्षातून पटोले यांनी आत्तापर्यंत पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले, मात्र यावेळी भाजपने त्यांच्याविरोधात आखलेली रणनिती पाहता, ते सहाव्यांदा येथून बाजी मारतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सुपर हॉट ठरतो साकोली विधानसभा मतदारसंघ
साकोली मतदारसंघात साकोलीसह लाखानी आणि लाखांदूर हे तालुके येतात . या मतदारसंघात कुणबी, तेली आणि कोहळी समाजाचे मतदान जास्त आहेत. नाना पटोले यांनी या मतदारसंघाचे आत्तापर्यंत पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या विरोधात गेल्यावेळी भाजपने परिणय फुके यांना ताकद दिली. मात्र थोड्या फरकाने ते निवडणूक हरले. या मतदारसंघातील लाखांदूर तालुक्यात पटोले यांचा जास्त प्रभाव आहे.
या तिन्ही तालुक्यात जंगल असून फारसा औद्यागिक विकास नाही. गेल्यावेळी मतदानाच्या दोन दिवस आधी परिणय फुके आणि नाना पटोलेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या हाणामारीत भाजपच्या परिणय फुकेंचा भाऊ तर काँग्रेसच्या नाना पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता. त्याच सहानुभूतीच्या आधारावर पटोले विजयी झाले असंही काही विश्लेषकांचं म्हणणं होतं.
भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात
या निवडणुकीत स्वकीय व परकीय असा वाद होतो. शिवाय कुणबी, तेली या समाजाची मतेही निर्णाय ठरतात. तेली समाजाची येथे सुमारे 50 हजारांच्या आसपास मते आहेत. यावेळी भाजप नाना पटोले विरोधात नवा आणि संघ स्वंयसेवक असलेला चेहरा उतरवण्याची शक्यता आहे.
संघाच्या विदेश विभागाचे माजी सहकार्यवाह आणि भाजप कार्यकर्ते डॅा. सोमदत्त करंजेकर यांनी साकोलीत नाना पटोले विरोधात तयारी सुरु केली आहे. साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करु शकलेले नाही. तर उद्योगांची घोषणा झाली, त्यांची सुरुवात नाना पटोले करू शकले नाही असा सोमदत्त करंजेकर यांचा आरोप आहे.
करंजेकर यांची बाजू सध्यातरी जड
डॅा. सोमदत्त करंजेकर कुटुंबाच्या साकोली मतदारसंघात 16 शिक्षणसंस्था आहेत. ते तेली समाजातील असल्याने जातीचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरेल. साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करु शकलेले नाहीत असा आरोप विरोधकांकडून वारंवार होतो. नाना पटोले यांनी इतके वर्ष सत्तेत आमदार, खासदार राहूनही शेतकऱ्यांसाठी त्यांनी ठोस पावले उचललेली नाहीत.
या भागात धानशेती जास्त आहे. मात्र पटोले एखादा कारखाना, राईस मिल किंवा एखादी शिक्षण संस्था सुद्धा आणू शकलेले नाहीत. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या पटोलेंवर येथील जनता नाराज असल्याचे दिसते. हाच फॅक्टर करंजेकरांना विजयी करु शकतो, असे विश्लेषक सांगतात.
मतदारसंघाच्या समस्या कायम
पटोले यांनी रस्ते, वीज, रुग्णालये या समस्या सोडविल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र या मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रश्न अजूनही जैसे थेच असल्याचे दिसते. या मतदारसंघात पटोलेंनी रोजगारासाठी नवा उद्योग किंवा धानासाठी आवश्यक असलेले प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे विरोधक सांगतात. या तालुक्यातून नॅशनल हायवे क्र 6 जातो. मात्र तरीही येथे उद्योगधंदे आलेले नाहीत.
विकास झालेला नाही. त्याऊलट साकोलीत शाँपिंग काँम्प्लेक्स, रुग्णालय इमारत, कोंभळी पर्यटन स्थळांसाठी निधी, विविध विकासकामे झाली असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातो, मात्र त्यावर विकास होत नाही, असा आरोप थेट भाजपकडून कायम होतो. यावेळी करंजकर यांना भाजपने उमेदवारी दिली तर पटोलेंना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications