..अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही! रवींद्र चव्हाणांचा 'या'मुळे रामदास कदमांना थेट इशारा
Ramdas Kadam on Ravindra Chavan : तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी रामदास कदम यांना इशारा दिला आहे. रवींद्र चव्हाण हे युती तोडण्याचे काम करत असून त्यांना आवर घालावा तसेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा देखील घ्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती यांनत चव्हाण चांगलेच भडकले असून रामदास कदम यांना थेट सुनावलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचा ठाण्यात मेळावा झाला तेव्हा रामदास कदम यांनी चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. मात्र या टीकेनंतर चव्हाण प्रचंड संतापले असून त्यांनी रामदास कदम यांना इशारा दिला आहे. युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ. असं होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, ' अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना इशारा दिला आहे.

रवींद्र चव्हाणांवर काय केली होती टीका?
रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची अॅलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केली.
रामदास कदम यांनी केलेल्या टीकेवरुनच आता वातावरण पेटलं आहे. रामदास कदमांच्या टीकेला आता रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन पक्षांच्या नेत्यांमधील ह्या कलगीतु-यामुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्नी उपोषण
गेल्या 17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत माणगावमध्ये अनेक संघटनांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमरण उपोषण केलं. सलग दुसऱ्या दिवशीही या कार्यकर्त्यांनी आपला उपोषण सुरू ठेवलं. शुक्रवारी या कार्यकर्त्यांना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी भेट देऊन थेट मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन संपर्क साधून दिला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा भाऊ अजून आहे, त्यामुळे लवकरच या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपोषणकर्त्यांना मंत्रालयात सोमवारी 19 ऑगस्ट रोजी बैठकीची वेळ दिली आहे. 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आक्रोश समितीचे पदाधिकारी संजय यादवराव यांना बैठकीसाठी मंत्रालयात आमंत्रित केले आहे. या बैठकीत आता कोणता तोडगा निघतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications