मोठी बातमी ! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, अनिल परबांना भरवला पेढा
Mumbai: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, नीट परीक्षा, पुणे ड्रग्ज प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर घोषणाबाजी केली. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान, विधानभवन परिसरात एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडल्याचं पहायला मिळालं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. गेल्या ३० वर्षापासून या जागेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.
त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचे केलेले अभिनंदन हे मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दुसरीकडे निकालाआधीच भाजपने पराभव मान्य केला आहे का? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर केला जात आहे.
नेमकं काय घडलं
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी तिथे अंबादास दानवे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अनिल परब उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले.
पुढे, आमचे ३१ खासदार निवडून आले आहेत असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यापुढे पेढ्याचा बॉक्स धरला. यावर पाटील यांनी त्यातून अनिल परब यांना पेढा दिला. मी ऍडव्हान्समध्ये यांचा पेढा वाटतो असे म्हणत परबांना चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
ठाकरे व पाटलांच्या एकमेकांना कोपरखळ्या
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंकडे बघत, उद्धवजींना बऱ्याच दिवस भेटल्यामुळं मी थोडासा बिथरलो होतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच उपस्थितात हशा पिकला. तसेच असच प्रेम राहुद्या असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे पाटलांना म्हणाले. बसा आमच्यासोबत, गप्पा मारुया, असा आग्रह ठाकरेंनी केला. पण चंद्रकांतदादा यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं ते तिथून निघून गेले.
विधानसभेच्या दृष्टीने अधिवेशन महत्त्वाच
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. त्या तुलनेने माहविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकत मोठं यश मिळवलं. मविआने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परिणामी सरकारची, योजनांची पोलखोल करत राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न महविकास आघाडीचे नेते करताना दिसणार आहेत.












Click it and Unblock the Notifications