पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास अखेर संपला, भाजपकडून ५ नावांची यादी जाहीर
मुंबईः विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टीळेकर, अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनामुळे मराठवाड्यातील भाजपला बळ मिळण्याची शक्यता आहे.

असं आहे पक्षीय बलाबल
विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे एकत्रित २०१ आमदारांचं पाठबळ महायुतीकडे आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे ३७, ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १३ आणि शेकाप व अपक्ष प्रत्येकी एक असे मिळून ६७ आमदार महाविकास आघाडीचे आहेत. हे गणित लक्षात घेता विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात.
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाकडे ११ नावांची यादी पाठवण्यात आली होती. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप पक्षश्रेष्ठींनी यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले.
BJP announces the names of candidates for the Maharashtra Legislative Council biennial elections
— ANI (@ANI) July 1, 2024
Pankaja Munde also announced as party’s candidate for MLC elections pic.twitter.com/B3ijp0ZdCX
या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.
जानकरांचा पत्ता कट
भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या ५ नावांच्या यादीत धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश करण्या आलेला नाही. महादेव जानकर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक परभणी लोकसभा मतदारसंघात लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महादेव जानकर यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षाने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नावाला पसंती दिली आहे. सदाभाऊ खोत हे शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आगामी निवडणुकीतील समीकरण लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोतांना संधी दिली आहे.
रावसाहेब दानवेंचा समावेश नाही
रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आहेत. २०१९ ते २०२४ च्या या कार्याकाळात ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीदेखील होते. रावसाहेब दानवे हे दोन वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यानंतर ते सातत्याने चार वेळा लोकसभा निवडणुकीत केंद्रात जिंकून गेले.
मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका त्यांना बसल्याच बोललं जात आहे. या पराभवानंतर रावसाहेब दानवे यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय केलं जाईल, अशी चर्चा होती. रावसाहेब दानवे यांना राज्यसभेवर घेतलं जाईल अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications