Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुतीत 'दोस्तीत कुस्ती': भाजप कार्यकर्त्यांच्या '50 खोके'च्या घोषणांनी मुंबईत ठिणगी; सेना आक्रमक

Mahayuti internal conflict in BMC election 2026 : राज्याच्या राजकारणात 'महायुती' म्हणून एकत्र चालणाऱ्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील तणावानंतर, युतीमधील वादाचा हा वणवा आता थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पोहोचला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणाऱ्या या दोन मित्रपक्षांमध्ये शुक्रवारी प्रत्यक्ष रस्त्यावर 'राडा' पाहायला मिळाला. वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य करत चक्क '५० खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे युतीमधील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

BJP 50 Khoke slogan

नेमकी घटना काय?

मुंबईतील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात 'मैत्रीपूर्ण लढत' होत आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या एकाच परिसरात समोरासमोर आल्या. सुरुवातीला वातावरण शांत असताना अचानक भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माईकवरून शिंदे गटाला डिवचण्यासाठी '५० खोके एकदम ओके' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

वास्तविक, ही घोषणा आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका करण्यासाठी वापरली जात होती. मात्र, आता सत्तेतील मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच ही भाषा वापरली गेल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. प्रत्युत्तरात शिंदे गटानेही जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

'दोस्तीत कुस्ती'ची पार्श्वभूमी: एकाच जागेवर दोन उमेदवार

या वादाची मुळे जागावाटपाच्या गुंतागुंतीत आहेत. वॉर्ड क्रमांक १७३ हा अधिकृतपणे शिंदे सेनेला सुटला होता आणि पक्षाने पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी पक्षाचा 'एबी फॉर्म' जोडून अर्ज दाखल केला आणि तो वैध ठरला. वरिष्ठ पातळीवर तोडगा न निघाल्याने या जागेवर 'मैत्रीपूर्ण लढत' जाहीर करण्यात आली. मात्र, मतदानाला काही तास शिल्लक असताना ही 'मैत्री' संपून त्याजागी उघड शत्रुत्व पाहायला मिळत आहे.

संजय शिरसाट यांचा भाजपला थेट टोला

या घटनेचे पडसाद तातडीने उमटले असून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, "भाजपमध्ये कोण महारथी आहेत, हे तपासावे लागेल. अशा घोषणा देण्याआधी त्यांनी आपल्या नेत्यांना विचारले पाहिजे. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका. ज्यांनी या घोषणा दिल्या, त्यांची संस्कृती कुठे गेली? या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, अशी आम्हाला खात्री आहे."

भाजपकडून सारवासारव

वाढता वाद पाहून भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी सावध पवित्रा घेतला आहे. "संबंधित कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. मित्रपक्षाबद्दल अशी घोषणाबाजी करणे अयोग्य असून, यामुळे चुकीचा संदेश जातो," असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेला हा अपमान शिंदे गटाचे कार्यकर्ते विसरतील का, हा मोठा प्रश्न आहे.

राजकीय परिणाम आणि मतदारांमधील संभ्रम

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा केवळ एका वॉर्डमधील वाद नसून महायुतीतील अविश्वासाचे प्रतीक आहे.

मतदारांवर परिणाम: मतदानाच्या काही तास आधी मित्रपक्षांमध्ये अशा प्रकारे रस्त्यावर राडा झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

दुसऱ्या फळीतील नेत्यांचा संघर्ष : वरिष्ठ नेते जरी एकत्र असल्याचे दाखवत असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी : छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ठिणगी पडल्याने आगामी काळात महायुतीला या अंतर्गत संघर्षाचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+