उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर; मुंबई, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली, पुढचं भवितव्य कसं?
Defeat in assembly elections, Uddhav Thackeray's worries increased : विधानसभा निवडणुकीचा निकालाने उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटासमोर अस्तित्वाचे नवे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या आता ही संख्या अवघ्या वीस वर आली आहे. त्यातही मुंबई आणि ठाणे पट्ट्यात घटलेली ताकद उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढवणारी आहे. संघटना टिकवण्याचे एक मोठे आव्हान देखील उद्धव यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
लोकसभेतही शिंदेंना तोडीस तोड जागा मिळाल्या
2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तब्बल 56 जागा मिळाल्या होत्या. आणि युतीत असलेल्या भाजपच्या पारड्यात महाराष्ट्राने 105 जागांचे दान टाकले होते. महाराष्ट्राने स्पष्ट बहुमत देऊनही उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला जवळ केले. मुख्यमंत्रीपद मिळाले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फुटली आणि बहुसंख्य आमदार शिंदे यांचे नेतृत्वाखाली वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत दाखल होत गेले. आणि निवडणूक आयोग तसेच विधिमंडळ अध्यक्षांनीही शिंदे यांच्याकडे शिवसेना खरी असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत देखील शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेने उद्धव यांच्या तोडीस तोड जागा मिळवल्या.

आपण जनतेच्या न्यायालयात दाद मागू असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत अवघ्या 20 जागा मिळाल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आहेत. उद्धव यांच्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे.
मुंबई, ठाणे महापालिकेत ठाकरेंचा जीव अडकला
मुंबई आणि ठाणे या दोन महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा जीव अडकलेला आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला 82 तर शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या. युती असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेत हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला. आणि मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव यांच्या हाती कोणत्याही अडथळ्यांच्या शिवाय आली. पण 2019 साली उद्धव ठाकरे यांनी गडबड केल्याने मुंबई महानगरपालिकेकडे भाजपचे लक्ष वेधले गेले. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील असंख्य गैरप्रकार भाजपने खणून काढले. आणि उद्धव अडचणीत येत गेले.
ठाणे जिल्ह्यात उद्धवसेना भुईसपाट
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरात उद्धव यांना मिळालेल्या जागा मोठ्या संख्येने कमी झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात उद्धवसेना भुईसपाट झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या हक्काच्या जिल्ह्यात उद्धव यांच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातही तीच स्थिती आहे. नाशिकमध्ये देखील धवल कामगिरी करता आलेली नाही.
ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली
राज्यातील सत्ता हा स्थानिक कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असतो. मुंबई महानगरपालिकेची सत्ता जाऊन दोन वर्षे झाली आहेत. त्यातच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे उद्धव यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल निर्माण होणे साहजिक आहे. ठाणे जिल्ह्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या जिल्ह्यातील एकही महानगरपालिका उद्धव यांना मिळण्याची मुळीच शक्यता नाही. विविध जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. सत्ता स्थाने मिळत नसतील तर कार्यकर्ते टिकत नसतात. भविष्याकडे पाहता कार्यकर्ते टिकवण्याचे आणि नवे कार्यकर्ते जोडण्याचे आव्हान उद्धव यांच्यासमोर उभे आहे. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि स्वतः उद्धव ठाकरे यांना यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications