भाजपचे चारवेळा नगरसेवक, आता शिवसेनेतून लढणार; संतोष शेट्टी देणार भिवंडी पूर्वमधून लढत
भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर आहे. १९७० आणि १९८४ या दोन वर्षांमध्ये घडलेल्या हिंदू मुस्लिम दंगलींमुळे या शहराला मिनी पाकिस्तानही म्हटले जायचे. कामगारांची वस्ती, मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच आगरी आणि कोळी वर्ग तसंच पद्मशाळी समाजही या ठिकाणी आहे. त्याशिवाय रोजगारासाठी स्थलांतरित झालेले अनेक उत्तर भारतीय भिवंडी परिसरातच राहतात.
भिवंडी हे मुंबईचं गोदाम आहे असं मानलं जातं इतकी गोदामं या भागात आहेत. तसंच भिवंडी हे तालुक्याचं शहर असून ते ठाणे जिल्ह्यात येतं. १९८०, १९८५ च्या दरम्यान हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शहरातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळी समीकरणे आहेत. सातत्याने बदलणाऱ्या स्थितीमुळे या प्रत्येक मतदारसंघाने प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या कौल दिलेला दिसून येतो. विशेषतः भिवंडी पूर्व मतदारसंघाचा कौल हा सातत्याने बदलता राहिलेला आहे. कधी शिवसेना, कधी समाजवादी पक्ष अशी कूस या मतदारसंघाने बदलली.

शिवसेनेची संतोष शेट्टी यांना उमेदवारी
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. संतोष शेट्टी हे भिवंडी पूर्व परिसरातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आहेत. हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच अन्य धर्मीय संघटनांशीही त्यांचा चांगला संबंध आहे. भाजपच्या तिकिटावर ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2014 साली भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती मात्र शिवसेनेचे उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी त्यांचा 4 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 17 दिवस प्रचार करून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांना अवघ्या १३०० मतांनी पराभूत केले. या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेली संतोष शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर होते.
अनुभव ही शेट्टींची जमेची बाजू
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी यांची महायुती आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. भाजपचे चार वेळा नगरसेवक असलेले संतोष शेट्टी यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. समाजाच्या सर्व स्तरात केलेले काम आणि मदतीला 24 तास हजर राहण्याची तयारी ही संतोष शेट्टी यांची वैशिष्ट्ये आहेत. तसेच त्यांना चार वेळेच्या नगरसेवक पदाचा प्रदीर्घ अनुभव देखील आहे. त्यांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू आहेत.
लाडकी बहीणची प्रभावी अंमलबजावणी
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेना किंवा भाजप या दोन्ही पक्षांच्या ताब्यात नसतानाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी येथे करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. या योजनेबद्दल मुस्लिम समाजातील महिलाही शिवसेना तसेच एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत आहेत.
आयुष्मान भारतचीही प्रभावी अंमलबजावणी
गोरगरिबांना महागडे औषधोपचार अगदी स्वस्तात करून देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणीही संपूर्ण भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रभावाने करण्यात आली आहे. विविध वर्गातील आणि समाज घटकातील कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला आहे ज्यात मुस्लिम, मराठी आणि तेलुगु यांचा विशेषत्वाने समावेश आहे. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत या समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत उपचार मोफत करता येणार आहेत.
रस्त्यांच्या कामांना सुरुवात
मागील महिन्यात संपूर्णपणे डिजिटाईज असलेल्या शाळेचे लोकार्पण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. मुलींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा या डिजिटल शाळेचा उद्देश आहे. भिवंडी शहरातील शिक्षण व्यवस्थेत हा एक क्रांतिकारी बदल असून शहरवासीयांच्या वतीने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. अर्थात भिवंडी शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था काही फार चांगली नव्हती मात्र अनेक रस्त्यांचे काम महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आली आहेत. नागाव, गैबी नगर आणि कचेरी पाडा येथील रस्त्यांची चांगलीच सुधारणा झाली आहे. मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर कामाची स्थानिक नागरिकांना प्रतीक्षा आहे.
शिवसेनेसाठी सोपी समीकरणे
भिवंडी पूर्व मतदार संघाची समीकरणे धार्मिक ध्रुवीकरणावर आधारित आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहराने मोठा उलट फेर करून दाखवला आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासारख्या तगडा उमेदवार पराभूत झाला. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर चित्र झपाट्याने बदलले असून माझी लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे महायुतीचा निष्ठावंत मतदार देखील दुखावला गेला असून तो आणखी आक्रमक झाला आहे. भाजपचे चार वेळा नगरसेवक असलेले संतोष शेट्टी शिवसेनेत गेल्यामुळे दोन्ही पक्षातील अंतर्गत सामंजस्याची भावना दृढ झाली आहे. त्या निमित्ताने एक चांगला संदेश युतीच्या मतदारांमध्ये गेला आहे. त्यामुळे संतोष शेट्टी यांच्यासाठी समीकरणे सोपी होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications