काय सांगताय, लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांची नाव वगळणार; 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Ladki Baheen Yojana : महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेतील 50 लाख महिला अपात्र ठरणार आहेत, असा बडा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते. अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. काल अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर जाधवल यांनी यावर विश्लेषण करताना भाष्य केले.
आतापर्यंत 9 लाख महिलांना अपात्र करण्यात आलंय
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळेच आम्हाला बहुमत मिळाल्याचं महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षाचे नेते मान्य करतात. लाडकी बहीण योजनेमुळेचा हा मोठा विजय झाल्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून अपात्र लाडक्या बहिणींना कमी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून अद्यापही सरकारकडून स्क्रुटीनी करण्यात येत आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीच्या बजेटमध्ये कपात?
त्यातच, यंदाच्या अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटनुसार लाडक्या बहिणींना कुठलीही वाढ मिळणार नाही. याउलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाडकी बहिण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भास्कर जाधव यांनी काय केला दावा, वाचा सविस्तर!
भास्कर जाधव हे विधानसभेत बोलत असताना त्यांनी महायुती सरकारला काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी 7 लाख 20 कोटी रुपयांच बजेट मांडलं. मात्र, मागील बजेटमध्ये 46.46 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अजित दादा हे आपण तपासून पाहा, जाणीवपुर्वक हा खर्च होत नाही का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. अजित दादांमध्ये आता बदल झालाय, दादा कविता करायला लागले म्हणून मी ही कविता आणल्या आहेत.
मी संघशाखेत गेलो, तुम्ही नागपूरात जाऊन टाळलंय...
भास्कर जाधव म्हणाले की, मी संघाच्या शाखेत गेलो आहे, मला माहीत आहे नमस्ते सदा वत्सल्ये मातृभूमे काय आहे, पण अजित दादा तुम्ही गेले नाहीत, असे म्हणत भास्कर जाधव यांनी अजित पवारांना टोला लगावला.
मी पालकमंत्री असताना संघाचं शिबीर माझ्या मतदारसंघात होतं, तेव्हा मी गेलो तर मला पक्षातून विचारण्यात आलं. मात्र, अजित पवार नागपूरला ही कधी गेले नाही, पण कोणाच्या तरी नादाने ते कवी झाले अशी मिश्कील टिपण्णी जाधव यांनी केली.
आता लाडका भाऊ गेला अन् गुलाबी जॅकेटही
पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, दादांच गुलाबी जॅकेट गेलं, काम झालं आता जॅकेट निघालं. लाडका, बहिण, भाऊ लाडके आजोबा सांगतील. आम्हाला तीर्थक्षेत्राला घेऊन गेले, आता अर्ध्यात सोडलं की काय? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. तसेच, गतवर्षी लाडक्या बहिणींना 46 हजार कोटी निधी मंजूर केला. मात्र, त्यातील 33 हजार कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.
..याचा अर्थ 50 लाख महिला या योजनेतून कमी होणार?
भास्कर जाधव पुढे बोलताना म्हणाले की, आता, यंदाच्या बजेटनुसार ही रक्कम फक्त 36 हजार कोटी एवढी केली आहे. याचा अर्थ 50 लाख महिला या योजनेतून कमी होणार आहेत, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. त्यामुळे, सरकारकडून सुरू असलेल्या लाडक्या बहीण स्क्रुटीनीतून आणखी किती महिला कमी होणार हा प्रश्न लाडक्या बहिणींसह सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, सध्या जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications