पैसे परत घेतलेल्या 'त्या' लाडक्या बहिणीचा वेगळाच दावा; वाचा, प्रकरणात नेमका का आलाय ट्विस्ट
शासनाचे निकष डावलून सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतलेल्या धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे पैसे सरकारने परत घेतले, अशा बातम्या आज सकाळपासून झळकल्या. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सरकारने पैसे परत घेतले नाहीत, तर आपण स्वतः आपली चूक सरकारच्या लक्षात आणून देत पैसे परत केले, असा दावा या लाडक्या बहिणीने केला आहे. लाडक्या बहिणीच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण
दुसर्यांदा सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरतपासणी सुरु केली. ज्या महिलांच्या अर्जाबाबत तक्रार आहे, तेवढेच अर्ज तपासले जात आहेत. त्यातच आज धुळे जिल्ह्यातील नकाने येथील एका महिलेच्या खात्यात दुबार योजनेतून गेलेले साडेसात हजार रुपये सरकारने परत घेतल्याच्या बातम्या आल्या. शासनाचे निकष डावलून या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे या बातम्यात सांगितले जात होते.
काय आहे महिलेचा दावा
दरम्यान, या महिलेने आता स्वतः पुढे येत वेगळीच माहिती दिली आहे. भिकुबाई खैरनार असे या महिलेचे नाव असून, या महिलेचा मुलगा पोस्टमन आहे. आपण जेव्हा अर्ज भरला तेव्हा चुकून आपल्या मुलाचे आधारकार्ड या प्रकरणाला जोडले होते. पैसे आले तेव्हा ते माझ्या खात्यात न येता माझ्या मुलाच्या खात्यात आले. त्यानंतर माझ्या मुलाचा ही चूक लक्षात आल्यावर त्याने स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जात तेथील अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वेळोवेळी मिळालेले पैसे आम्ही स्वतःहून सरकारला परत केले, असा दावा भिकुबाई खैरनार यांनी केला.
काय म्हणतोय मुलगा
या प्रकाराबाबत भिकुबाईचा पोस्टमन असलेल्या मुलानेही माहिती दिली. तो म्हणाला, आमची चूक झाल्याचं समजताचं आम्ही कलेक्टर ऑफीसला तसेच बालविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमच्या खात्यात आलेले पैसे आम्ही स्वत:हून जमा केले. प्रशासनाने आमच्याकडून ते पैसे मागितले नाही, असे योगित खैरनार यांनी स्पष्ट केले. नंतरचेही सर्व हप्ते आम्ही जमा केले. अपात्र ठरल्याने सरकारने आमच्याकडून ते पैसे वगैरे घेतले, असं काहीही झालं नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
पुन्हा केला अर्ज
हे सगळं झाल्यानंतर आम्ही माझ्या आईसाठी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आणि आधार कार्डही तिचेच दिले. त्यामुळे ती योजनेसाठी पात्र ठरली आणि आम्हाला पहिले 3 हजार नंतर 1500 असे आत्तापर्यंत एकूण 4500 रुपये अशी रक्कम खात्यात आलेली आहे, असे योगित खैरनार यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications