बीडच्या नवीन एसपींचा रविवारीच आदेश; म्हणाले, पहिलं काम म्हणजे, दहशत...
वाळू माफिया, गोळीबार, बनावट नोटा, कर्मचाऱ्यांना दमदाटी यानंतर मारामाऱ्या, खंडणी आणि आता थेट खूनाच्या प्रकारानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आलाय. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीडचे तत्कालीन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांची बदली केली. काल रात्री उशीरा नवनीत काँवत नवे पोलिस अधिक्षक म्हणून बीडला रुजू झाले. आज रविवारी पहिल्याच दिवशी त्यांनी कार्यालयात येत, आपले इरादे स्पष्ट केले.

रविवारी काँवत यांचे आदेश
काँवत म्हणाले, मी काल रात्री उशीरा हजर झालो. मात्र पोलिसांना रविवार-सुट्टी वगैरे काही नसते. त्यामुळे आज ऑफीसला आलो. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. चार आरोपी पकडलेत. आता उरलेले तीन आरोपी लवकरच जेरबंद होतील. यापुढे दहशत करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही, असा थेट इशारा नवीन एसपींनी पहिल्याच दिवशी दिला.
देशमुख कुटुंबाला भेटणार
एसपी काँवत म्हणाले, "मी येत्या दोन दिवसांत देशमुख कुटुंबाला भेट देणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन सविस्तर आदेश देणार आहे. बीड जिल्ह्यातील दहशत खपवून घेतली जाणार नाही. बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणणे, हे माझे पहिले कर्तव्य आहे. बीडच्या नागरिकांनी दहशतीखाली वावरू नये. कुठलेही अडचण असल्यास 24 तास मला संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गुन्हेगारांनो सावधान...
एसपी काँवत म्हणाले, बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारीमुक्त करणार आहे. बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या डोक्यात हवा गेली असेल, त्यांनी स्वतःला आवरावे, असा इशाराही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications