Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संतोष देशमुख हत्या प्रकरण:वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका, फरार आंधळेच्या 'गावफेऱ्यांनी' खळबळ!

Santosh Deshmukh murder case : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत.

एकीकडे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तर दुसरीकडे यातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे हा चक्क गावात येऊन गेल्याचा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या दुहेरी घडामोडींमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

Santosh Deshmukh murder case

सुप्रीम कोर्टाचा वाल्मिक कराडला जामीन नाकारला

बीड जिल्ह्यातील राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावत तूर्तास सुनावणी घेण्यास नकार दिला.

पुन्हा अर्जासाठी करावी लागणार प्रतीक्षा

जरी आज सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला असला, तरी तांत्रिकदृष्ट्या वाल्मिक कराड समोर एक मार्ग खुला ठेवला आहे. जर या प्रकरणाचा खटला (Trial) पुढे सरकला नाही, तर वर्षभरानंतर तो पुन्हा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो. यापूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि बीड जिल्हा न्यायालयानेही त्याचे जामीन आणि दोषमुक्तीचे अर्ज फेटाळले होते.

धनंजय देशमुख यांची 'कॅव्हेट' आणि न्यायाची मागणी

या सुनावणीपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केले होते. "आम्ही आमचे म्हणणे मांडल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये," अशी विनंती त्यांनी केली होती. "मागील दीड वर्षांपासून आमचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

फरार आरोपी कृष्णा आंधळे गावात? धक्कादायक दावा

एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असतानाच, दुसरीकडे तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

"कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती आम्ही सीआयडीला दिली आहे. तो मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांना गुंगारा देत असला तरी, त्याला जेलबंद करणे आवश्यक आहे. हे आरोपी सैतानी वृत्तीचे असून आमच्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे. आंधळेला अटक करून त्याची जिल्हाभरातून धिंड काढली पाहिजे," अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण?

९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता.

तपासाचा घटनाक्रम:

  • ९ डिसेंबर २०२४ : संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या.
  • १० डिसेंबर : जयराम चाटे आणि महेश केदार यांना तांबवा (केज) येथून अटक.
  • १२ डिसेंबर : तिसरा आरोपी घुले याला रांजणगाव (पुणे) येथून अटक.
  • १८ डिसेंबर : विष्णू चाटे याला बीडमधून अटक.
  • ४ जानेवारी : सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (पुणे) आणि सिद्धार्थ सोनवणे (कल्याण) यांना अटक.
  • सद्यस्थिती : कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.

हत्येचे नेमके कारण काय?

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच आहे. 'आवादा' कंपनीकडे मागितलेली खंडणी आणि त्यातून उद्भवलेला वाद या हत्येमागे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपपत्रात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गंभीर गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे मुख्य सूत्रधार गजाआड असताना, फरार आरोपीचा मुक्त वावर देशमुख कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता पोलीस कृष्णा आंधळेला कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+