महाराष्ट्र दिनी बीडमध्ये भीषण अपघात; कांदा काढण्यासाठी निघालेल्या 3 महिलांवर काळाचा घाला, 15 जखमी
Beed Accident : आज जागतिक कामगार दिन आहे. पण त्यांना कसला कामगार दिन अन् कसलं काय. त्या निघाल्या होत्या शेतातील कांदा काढण्याच्या कामासाठी पण त्यांना काय माहिती की, त्यांच्यावर काळाचा घाला पडणार म्हणून. अवघ्या काही मिनिटांमध्ये होत्याचे नव्हते झाले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बीड-अहिल्यानगर (अहमदनगर) महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला. कामगार दिनाच्या दिवशी कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पिकअपमधील अन्य जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
नेमका कसा झाला अपघात?
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता. मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. या पिकअप मध्ये साधारण 18-20 महिला होत्या. या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
दुसरीकडे, अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली. टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खोल ओढ्यात गाडी येताच टायर फुटले
पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचे समोरील टायर फुटल्याचे सांगितले जात आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजूरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जातात.












Click it and Unblock the Notifications