काळजाचा थरकाप उडवणारा नियतीचा क्रूर खेळ! मुलासह 2 नातींचा अंत अन् 24 तासांत बापानेही सोडला देह!
Baramati accident News : बारामती शहरातील महात्मा फुले चौकात घडलेल्या एका भीषण अपघाताने आचार्य कुटुंबावर दुःखाचा असा डोंगर कोसळला आहे, ज्यातून सावरणे केवळ अशक्य. अवघ्या 24 तासांच्या आत या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण बारामती आणि इंदापूर तालुक्यातील सणसर गावावर शोककळा पसरली आहे.
शनिवारी अपघाताने घेतला तिघांचा बळी...
शनिवारी (२७ जुलै) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने तीन जीव घेतले. या अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर, सध्या मोरगाव रोड, बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेल्या त्यांच्या चिमुकल्या मुली, १० वर्षांची सई आणि ४ वर्षांची मधुरा, यांनाही उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले आणि डोळ्यासमोरच ही करुण घटना घडली. एका क्षणात एका पित्याला आणि त्याच्या दोन्ही लाडक्या लेकींना काळाने हिरावून नेले.

आणि आज पित्यानेही जीव सोडला...
या हृदयद्रावक घटनेचा धक्का ओंकारचे वडील, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७० हून अधिक) यांना सहन झाला नाही. मुलाचा आणि नातींचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर, या धक्क्याने आज (सोमवारी, २८ जुलै) पहाटे त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
राजेंद्र आचार्य हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ऑटिझम आणि शुगरचा त्रास होता आणि ते बारामतीतील रुग्णालयात उपचार घेत होते.
दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणले होते. त्यांच्यासाठी फळे घेऊन येत असतानाच ओंकारला अपघाताने गाठले. एका दिवसात तीन जीव गमावल्याचे दुःख पचवणे त्यांच्यासाठी असह्य ठरले आणि अखेर त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
गावावर शोककळा..
एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा अवघ्या २४ तासांत मृत्यू झाल्याने सणसर गावात आणि बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदाने नांदणारे आचार्य कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले. नियतीचा हा असा घातकी वार आहे, ज्यातून सावरणे कुटुंबासाठी अत्यंत कठीण आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.












Click it and Unblock the Notifications