पद्धतशीरपणे 'हे' मुद्दे पुढे करत, भाजपने अमोल बालवडकरांना चीतपट केलयं?
निवडणुकीचे वारे वाहू लागले की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातातच, पण बाणेर-बालेवाडीच्या (Baner Balewadi) राजकारणात सध्या सुरू असलेले 'महायुद्ध' केवळ सत्तेसाठी नसून ते 'अस्तित्वासाठी' बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या आरोपांनंतर, भाजपने आता आक्रमक पवित्रा घेत बालवडकरांच्या राजकीय कार्यपद्धतीचीच 'पोलखोल' केली आहे. बाणेरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपने आक्रमक असे मुद्दे मांडत अमोल बालवडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.

'नगरसेवक' ते 'मालक' होण्याचा प्रवास
भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी अमोल बालवडकरांवर सर्वात मोठा हल्ला चढवला तो त्यांच्या 'महत्त्वाकांक्षे'वर. २०१७ मध्ये भाजपने सामान्य कार्यकर्ता म्हणून संधी दिली, पण अल्पावधीतच त्यांना पक्षापेक्षा मोठे व्हायचे होते, असा आरोप भाजपने केला आहे. "भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे हुकूमशाही चालत नाही," असे म्हणत लहू बालवडकर यांनी अमोल यांच्यावर 'पक्षमालक' होण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला. अमोल बालवडकर पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक पदाला जास्त महत्त्व देतात असा संदेश मतदारांमध्ये भाजपने पोहोचवला आहे.
'मातोश्री' ते 'सिल्व्हर ओक'
पत्रकार परिषदेत लहू बालवडकर यांनी एक खळबळजनक दावा केला. अमोल बालवडकर हे केवळ भाजपमध्येच नव्हते, तर ते मातोश्रीबाहेर घिरट्या घालत होते, संजय राऊतांच्या संपर्कात होते आणि सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून फिरत होते. या खुलाशामुळे अमोल बालवडकर यांची 'राजकीय विश्वासार्हतेवर' भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अन्याय' की 'शिस्तभंग'?
अमोल बालवडकर स्वतःवर 'अन्याय' झाल्याचा जे भावनिक कार्ड खेळत होते, त्याला भाजपने तथ्यांच्या आधारे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रमोद निम्हण यांचे उदाहरण: जर बालवडकरांची उमेदवारी रद्द होणे अन्याय असेल, तर अर्धा तास आधी उमेदवारी कापलेले प्रमोद निम्हण गप्प का?
- अवाजवी अटी: "इतर तीन उमेदवार मीच ठरवणार आणि मलाच महापौर करा," ही बालवडकरांची अट म्हणजे पक्षावर केलेले दडपण होते, हे आता जनतेसमोर आले आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
सोशल मीडियाचे 'वर्च्युअल' विश्व विरुद्ध प्रत्यक्ष 'विकास'
भाजपच्या मते, अमोल बालवडकर केवळ सोशल मीडियावर भावनिक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याउलट, भाजपने स्मार्ट सिटींतर्गत झालेले २१ प्रकल्प आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेली कामे यांचा पाढा वाचला. निवडणुकीत शेवटी 'भावनिकता' जिंकते की 'विकासाचा गाडा', यात भाजपचा वरचष्मा सध्या तरी दिसून येत असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर... अमोल बालवडकर यांनी भाजपवर वार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण भाजपने त्यांच्याच जुन्या 'महत्त्वाकांक्षी खेळी' त्यांच्यावर उलटवल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पक्षशिस्त आणि संयम या भाजपच्या मूळ तत्त्वांना बालवडकरांनी हरताळ फासल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. आता बाणेरची जनता 'भावने'ला कौल देते की भाजपच्या 'शिस्ती'ला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications