बाळापूरात सिरस्करांची तिसऱ्यादा लागणार लाँटरी; ठाकरे गट व वंचितला मतविभागणीचा फटका?
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेच्या फुटीत सुरुवातीला एकनाथ शिंदे व नंतर पुन्हा उद्धव ठाकरेंना साथ देणाऱ्या बाळापूरच्या आ. नितीन देशमुख यांच्यासाठी यंदाची लढाई सोप्पी नसल्याचे दिसत आहे. जागावाटपात शिंदे गटाने हा मतदारसंघ हट्टाने मागून घेतला असून, येथून दोन वेळा आमदार राहिलेल्या बळीराम सिरस्करांना उमेदवारी दिली आहे. वंचितनेही येथून उमेदवार उभा केल्याने, तिरंगी लढतीचा फायदा शिंदे गटाला मिळण्याचा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
सिरस्करांना अनुभवाचा फायदा
बळीराम सिरस्कारांनी बाळापूर मतदारसंघाचे यापूर्वी दोनहा प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये ते भारिप-बहुजन महासंघ समर्थित अपक्ष, तर २०१४ मध्ये भारिप-बमसंच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत बाळापुरातून पत्ता कट केला. त्यामुळे नाराज झालेल्या सिरस्कारांनी वंचितला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत गेले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी देखील सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. बाळापूरमधून त्यांची तयारी सुरू असतानाच मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला. त्यानंतर ते शिंदे गटाच्या संपर्कात गेले. शिवसेनेने देखील उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. भाजपनेच उमेदवारीसाठी सिरस्कारांना शिंदे गटात पाठवले, हे उघड गुपित आहे. दोन वेळा आमदार राहिलेल्या सिरस्करांसाठी या मतदारसंघातील अनुभव यावेळीही कामाला येणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपची ताकद येणार कामी
अकोला तालुक्यातील पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. अकोला पूर्व, पश्चिम, अकोट व मुर्तीजापूर येथे भाजपचे आमदार आहेत. फक्त बाळापूर हे यापूर्वी भाजपच्या हातात नव्हते. मात्र या मतदारसंघात भाजपची ताकद चांगली आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अकोला जिल्ह्यात शत-प्रतिशतचा नारा दिला आहे. त्यामुळे बाळापूर तालुक्यात भाजपचे बळही वाढले आहे. हेच सिरस्करांसाठ जमेची बाजू ठरणार असल्याचे दिसत आहे.
मतांच्या धृविकरणाचा ठाकरे गट- वंचितला फटका
बाळापूर मतदारसंघासह जिल्ह्यात माळी समाजाची मोठी मतपेढी आहे. हे लक्षात घेऊनच महायुतीने सिरस्कारांना संधी दिल्याचे बोलले जाते. या मतदारसंघातील हातरुण, वाडेगाव, पातूर येथे मुस्लिम समाज जास्त आहे. परंतु माळी, कुणबी, मराठा, वंजारी, बौद्ध समाजही येथे लक्षणिय आहे. मुस्लिम व बौद्ध समाजाच्या मतांची वंचित व मविआच्या उमेदवारांमध्ये विभागणी होऊन ओबीसी व मराठा समाजाची मते सिरस्करांच्या पारड्यात पडण्याचे अंदाज बांधले जात आहेत.
सिरस्करांना मोठ्या नेत्यांचा फायदा
या मतदारसंघात भाजपचे माजी आ. नारायणराव गव्हाणकर व भाजपचेच दिवंगत आ. किसनराव राऊत यांचा मोठा पगडा आहे. शिवाय तेजराव थोरात, अनिल राऊत, राजेश राऊत, अमोल साबळे या भाजपच्या नेत्यांनीही आपापले गड शाबूत ठेवलेले आहेत. महायुतीचा धर्म म्हणून हे सगळे नेते सिरस्करांचे काम करतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून माजी आ. गोपीकिशन बाजोरिया, माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, अजित पवार गटाचे युवा नेते संदीप पाटील, कृष्णा अंधारे या नेत्यांचाही सिरस्करांना फायदा होण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
लाडक्या बहिणी देणार महायुतीला साथ
या मतदारसंघात 1 लाख 50 हजार 199 महिला मतदार आहेत. शिवाय या मतदारसंघात एक लाखांहून अधिक महिलांनी लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. याच लाडक्या बहिणी यावेळी आमदार ठरवतील, अशीही एक शक्यता आहे. शिंदे गटासाठी ही जमेची बाजू असल्याचे सांगितले जात आहे. त्याऊलट ठाकरे गटाचे विद्यमान आ. नितीन देशमुख व वंचितचे उमेदवार माजी आ. नतिकोद्दिन खतिब यांच्यासाठी ही निवडणूक अवघड असल्याचे सांगितले जात आहे. खतिब हे काँग्रेसमधून वंचितमध्ये आल्याने, त्यांना पूर्वीची काँग्रेसची मते मिळून आ. देशमुख यांना फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications