राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय? बदलापूर घटनेवरुन जयंत पाटलांचा संतप्त सवाल
बदलापूर :- बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी शाळेसमोर ठिय्या आंदोलन तसेच रेल्वे रोको करण्यात आंदोलन केले. यानंतर विरोधकाही आता राज्य सरकारवर तुटून पडले आहेत.
शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थितीत केला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे?
आधी नवी मुंबई, आता बदलापूर !
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 20, 2024
बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता…
राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय?
राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे. फक्त उद्घाटनं, सोहळे, चमकोबाजीमध्ये व्यस्त असणाऱ्या 'इव्हेंटजीवी' सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतली दखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री शिंदेनी माध्यमांशी बोलताना सागितले की, या संस्थाचालकाचीही चौकशी केली जाणार असून, दोषी आरोपींविरोधात कठोर कारवाई करणार जाणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांना आदेश दिले आहेत. तसेच या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर शिपायाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर सात दिवसांनी आज जनक्षोभ उसळला आहे. या घटनेनंतर राज्यसरकार गंभीर दखल घेत असून दुसरीकडे बदलापूरमध्ये मोठे जनआंदोलन केले जात आहे. आंदोलकांनी पोलीसांना विनंती केली आहे की, कृपया या व्यक्तीची सखोल चौकशी करुन त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.












Click it and Unblock the Notifications