बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पुणे : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दिवसभर आंदोलकांनी या घटनेच्या विरोधात बदलापूर स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं. बदलापूर घटनेप्रकरणी विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आज राज्यभरात महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहेत. पुण्यात शरद पवार गटाने या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले आहे. या आंदोलनस्थळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुडलक चौकामध्ये रस्त्यांवर बसून ठिय्या मांडला.
हातामध्ये पोस्टर घेत बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, चिमुकल्यांना न्याय द्या, अशी घोषणाबाजी केली .'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या' तसेच 'महिला आयोग हाय हाय', महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, चिमुकल्यांना न्याय द्या, 'एकनाथ शिंदे जबाब दो' अशी घोषणाबाजी शरद पवार गटाकडून करण्यात आली .

माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. त्यामुळे माझी पोलिस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा अशी विनंती खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत एक ट्टिट करुन सुळे यांनी ही विनंती केली आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला,अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.
यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती.












Click it and Unblock the Notifications