मोठी बातमी ! बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून भेटींवर तात्पुरती बंदी
बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात करून काही दिवस उलटल्यानंतर माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या तब्येतीत अचानक घसरण झाली आहे. सध्या ते गुरुकुंज मोझरी येथे आंदोलनस्थळीच आहेत. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांच्या तब्येतीकडे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. डॉक्टरांनी पुढील ३० मिनिटांसाठी त्यांना कुणीही भेटू नये, असा सल्ला दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते अमरावतीत दाखल
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जनतेचा आणि शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आंदोलनासाठी राज्यभरातील प्रहार कार्यकर्ते अमरावतीत पोहोचत आहेत. तसेच अनेक शेतकरीही गुरुकुंज मोझरी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. यामुळे आंदोलनस्थळी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगेंची भेट आणि पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी आज, ११ जून रोजी बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंदोलनासाठी आपला ठाम पाठिंबा दर्शवला. "बच्चू कडू यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करणे ही वेळेची गरज आहे," असं जरांगेंनी स्पष्ट केलं.
मागण्या मान्य होईपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही
बच्चू कडू यांनी आपली भूमिका अजूनही ठाम ठेवली आहे. "सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्याशिवाय मी अन्नाचा एकही कण खाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केली. त्यांच्या या उपोषणामुळे १० जूनपर्यंत त्यांच्या वजनात दोन किलो घट झाली होती, आणि आज प्रकृतीत आणखी घसरण झाली आहे.
वैद्यकीय पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांच्या आरामासाठी आणि प्रकृतीच्या निगराणीसाठी आंदोलनस्थळी तात्पुरती भेटी बंद ठेवण्यात आल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications