मृत्यू अहिल्यानगरला तर कबर खुल्ताबादला कशी? मातीतून संगमरवरापर्यंत कसा आहे कबरीचा इतिहास? वाचा
मुघल बादशाह औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. खरं तर, औरंगजेबाचा मृत्यू हा अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात झाला होता. मात्र त्याची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद येथे बांधली गेली होती. या घटनेमागे एक इतिहास आहे. हा इतिहास काय व वाद काय याच विषयी आपण आज माहिती घेऊ...

कसा झाला मृत्यू?
मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज यांचा तिसरा मुलगा असलेल्या औरंगजेबाचं पूर्ण नाव अबुल मुझफ्फर मुई-उद-दिन मुहंमद असं आहे. 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. 3 मार्च 1707 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अहमदनगर येथील भिंगार येथे त्याचा म्हातारपण व नैराश्याने त्याचा मृत्यू झाला.
खुलताबादला बांधली कबर
औरंगजेब हा सुफी संत शेख झैनुद्दीन यांना गुरू मानत होता. त्यांच्या दर्ग्याच्या परिसरातच मृत्यूनंतर आपल्याला दफन करावे अशी त्याची इच्छा होती. तसे त्याने मृत्यूपत्रात नमूद केल्याचेही सांगितले जाते. त्यानुसार मुलगा आझमशाह याने खुलताबाद येथे झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाचे दफन केले आणि कबर बांधली. अहिल्यानगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाला संभाजीनगरमधील खुलताबाद येथे आणण्यात आले होते, असे काही इतिहासकार सांगतात.
काय होते मृत्यूपत्रात?
औरंगजेबाला आपल्या मृत्यूची चाहूल लागल्यानंतरच त्यानं आपलं मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते. त्यात त्यांनं आपल्या मृत्यूनंतरच्या दफनविधी आणि कबरीबाबत लिहून ठेवले होते. त्यात अंतिम संस्कार कोणताही गाजावाजा न होता करावे. समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी. अंतिम संस्कार औरंगजेबाच्या स्वकमाईच्या पैशातून करावेत, असे लिहिले होते.
कशी आहे कबर?
औरंगजेबाच्या इच्छेचा मान ठेवून मुलगा आझमशाह याने अवघ्या 14 रुपये 12 आणे इतक्या पैशात त्याची कबर उभारली. हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून मिळवले होते, असे सांगितले जाते. ही कबर अत्यंत साध्या पद्धतीने बांधण्यात आलेली आहे. या कबरी वरती औरंगजेबाच्या इच्छेनुसार फक्त एक सब्जाच झाड आहे. त्याला वरून कोणत्याही प्रकारचं छत नाहीये.
कबर संगमरवरी कशी झाली?
१९०४ मध्ये ब्रिटीश व्हाईसराॅय लाॅर्ड कर्झन याने या कबरीला संगमरवरी सजावट केली. १९५१ मध्ये सरकारने या कबरीचा वारसा स्थळात समावेश केला. ही कबर औरंगजेबाच्या मुलाने मातीने बांधली असली तरी, ब्रिटीशांनी ती कबर संगमरवरी केली. त्यामुळेच सध्या वाद पेटला आहे.












Click it and Unblock the Notifications