महाराष्ट्र हादरला ! प्रसिद्ध उद्योगपतीच्या भाच्यावर जीवघेणा हल्ला, नेमकं चाललयं काय?
स्टील उद्योगातील जालना शहराचे मोठे नाव, उद्योजक नरेंद्र मित्तल यांच्या कुटुंबाला लक्ष्य करत, त्यांच्या भाच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (२२ ऑक्टोबर २०२५) रात्री भाजप कार्यालयाच्या शेजारी असलेल्या संभाजीनगर परिसरात ही भयानक घटना घडली. यश विजय मित्तल (उद्योगपती नरेंद्र मित्तल यांचे भाचे) यांच्यावर अज्ञात १० ते १५ मोटारसायकलस्वार गुन्हेगारांनी हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्ल्याची थरारक घटना
प्राप्त माहितीनुसार, यश मित्तल हे त्यांची पत्नी साक्षी मित्तल यांच्यासह दिवाळीनिमित्त नातेवाईकांच्या भेटीहून रात्री सुमारे १०.३० वाजता मुंडे चौकातून आपल्या निवासस्थानाकडे परतत होते. त्याच वेळी, १० ते १५ संशयित युवकांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. यश मित्तल आपल्या घराच्या जवळ पोहोचताच, या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला.
घरातून आरडाओरड ऐकून नातेवाईक आणि परिसरातील नागरिक बाहेर आले असता, यश मित्तल यांच्या डोक्यावर लोखंडी गट्टूने जोरदार प्रहार करण्यात आल्याचे दिसून आले. या हल्ल्यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. साक्षी मित्तल यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
गंभीर जखमी यश मित्तल ICU मध्ये
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या यश मित्तल यांना तातडीने शहरातील दीपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालल्याचे पाहून, डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील साई न्यूरो सिटी हॉस्पिटलमध्ये हलवले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. संपूर्ण मित्तल कुटुंब आणि जालना उद्योग जगतासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
एकेकाळी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर गेल्याचं राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून सिद्ध होतं. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर ऐन दिवाळीत कसा… pic.twitter.com/M270Jc6qOS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 24, 2025
गुन्हा दाखल, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
या भयंकर घटनेनंतर उद्योजक नरेंद्र मित्तल यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा क्रमांक ०९०१, दिनांक २३-१०-२०२५ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ११५, ११८ आणि ३५२(३) अंतर्गत 'जीवघेणा हल्ला' (Attack on Narendra Mittal nephew) म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अजय बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण (जमीन विवाद, जुनी वैमनस्य, खंडणी किंवा केवळ दहशत) काय आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात दहशतीचे वातावरण
स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग आणि उद्योग जगताने पोलिसांकडे तातडीने या हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी त्वरित आणि प्रभावी पाऊले उचलणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडणे हे जालना पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.












Click it and Unblock the Notifications