जसा चष्मा तसा... संजय राऊत-उद्धव ठाकरेंना अण्णा हजारेंचा त्यांच्या स्टाईलने 'टोला'; नेमका वाद काय?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ठाकरे गटाचा वाद आता विकोपाला गेला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टिका केल्यानंतर आता अण्णा हजारे यांनी या टिकेला जोरदार प्रतिउत्तर देत उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

नेमका काय होता वाद?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. त्यांच्या भ्रष्ट्राचारामुळे ते पडले, असे अण्णा म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊतांनी या प्रकरणात उडी घेत, अण्णा हजारेंना डिवचले होते. संजय राऊत या प्रकरणावर बोलताना म्हणाले होते की, अण्णा हजारे यांना महात्मा करण्यात केजरीवाल, सिसोदीया यांचा मोठा हात होता. अण्णा हजारेंनी दिल्ली कधी पाहिली असती? जंतरमंतर कधी पाहिले असते? ते फक्त राळेगणचेच दैवत म्हणून राहिले असते. पण केंद्रात मोदी सरकार महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार यांच्या काळात भ्रष्ट्राचाराचे जे स्फोट झाले तेव्हा अण्णांनी कूसही बदलली नाही. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिले. अण्णा हजारेंची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता त्याच आरोपांना अण्णा हजारेंनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले अण्णा?
संजय राऊतांना उत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले की, ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, तसंच जग दिसणार असं म्हणत अण्णांनी एका वाक्यात संजय राऊतांच्या विधानावर उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनीही अण्णांवर टिका केली होती. ते म्हणाले होते, "दिल्ली विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव असून तो निकाल मी मानत नाही. दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली", असा टोला उद्धव ठाकरेंनी अण्णा हजारेंना नाव न घेता लगावला होता. आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. अण्णा म्हणाले, "पत्रकारांनी मला प्रश्न विचाराला म्हणून मी उत्तर दिलं. नाहीतर मी राजकारणावर फारसा बोलत नाही. पण सर्व पत्रकारांनी त्यांची प्रशंसा केली. एखादा माणूस चुकला असेल, तर चुकू द्यायचं. आपण कशाला त्यावर बोलायचं?" असे खोचक उत्तर अण्णा हजारेंनी ठाकरेंना दिले.
वाद कोठून सुरु झाला?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपला सत्ता मिळाली. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 48 जागांवर भाजपने विजय मिळाला. तर 'आप'ला 22 जागांवर समाधान मानावे लागले. यावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं पण त्यांनी दारुवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले होते. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती.












Click it and Unblock the Notifications