पार्थ पवारांवर FIR झाला तर अजित पवारांचा राजीनामा नक्की; अंजली दमानियांचा दावा, वाचा संपूर्ण प्रकरण!
Anjali Damania Vs Ajit Pawar Over Parth Pawar Land Scam : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे येथील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे.
या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल त्वरित जाहीर करण्याची मागणी करताना, "एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट झालेच पाहिजे. एकदा पार्थ यांचे नाव गुन्ह्यात आले की, अजित पवार यांना राजीनामा द्यावाच लागेल आणि त्यासाठीच माझा लढा सुरू आहे," असा थेट इशारा दमानिया यांनी दिला आहे.

भेदभावपूर्ण कारवाईचा आरोप
दमानिया यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करताना म्हटले की, सामान्य नागरिकांसाठी एक आणि राजकारण्यांसाठी दुसरा, अशी दुहेरी कायदा व्यवस्था राज्यात सुरू आहे.
शीतल तेजवानी यांना महार वतनाच्या जमीन हडप प्रकरणात झालेली अटक केवळ दिखावा आहे. पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये नाही. १८०० कोटींची सरकारी जमीन हडप करूनही मुख्य भागीदाराला अटक होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
९९% भागीदार, तरीही नाव नाही
दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. "जमीन खरेदी करणारी 'अमेडिया' कंपनी आहे आणि त्यात पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे. असे असतानाही, केवळ १ टक्का भागीदारी असलेल्या आणि सहीचे अधिकार असलेल्या व्यक्तीचे नाव एफआयआरमध्ये टाकण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्य भागीदाराचे नाव गुन्ह्यात समाविष्ट झालेच पाहिजे, अशी मागणी त्या फडणवीसांकडे करणार आहेत.
राजीनाम्याचा दावा
पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये आल्यास अजित पवारांना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागेल आणि हाच त्यांच्या लढ्याचा अंतिम उद्देश असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले.
'दिग्विजय पाटील पळून गेल्यास जबाबदार कोण?'
दमानिया यांनी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू असतानाच, पार्थ पवार यांचे चुलत बंधू आणि या प्रकरणात एफआयआर झालेले दिग्विजय पाटील यांना अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लग्नासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला.
चौकशीतील ढिलाई
"चौकशीला पुन्हा हजर राहण्याची ग्वाही सगळेच देतात. पण एकदा देश सोडून पळून गेल्यावर परत किती जण येतात? आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय, त्यातील एक माणूस दाखवा, जो परत आलाय," असे म्हणत दमानिया यांनी तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभे केले.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
दिग्विजय पाटील यांना ७ ते १४ वर्षांची शिक्षा होण्यासारखा गंभीर गुन्हा दाखल असताना, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देणे योग्य नाही. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी पाटील यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली, त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.
तपोवन वृक्षतोड : महाजनांचे 'षडयंत्र'
अंजली दमानिया यांनी केवळ पुणे घोटाळ्यावरच नव्हे, तर नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी प्रकरणीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामच्या नावाखाली जमीन बळकावून तिथे मुंढव्यासारखेच षडयंत्र केले जात आहे, असे मला कळते आहे. हे षडयंत्र गिरीश महाजन करत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण समर्थन देत आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.
जनतेच्या पाठिंब्याची गरज
नाशिकची जनता, लहान मुलांसह, झाडांना पकडून उभी आहे आणि जमिनी भूईसपाट करून बिल्डर-राजकारण्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा केवळ नाशिकचा विषय नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने नाशिककरांच्या पाठीशी ताकदीने उभे राहायला पाहिजे, असे आवाहन दमानिया यांनी केले.
विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
या गंभीर प्रकरणांमध्ये विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका न घेतल्याबद्दल अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. पार्थ पवारांच्या एफआयआरसाठी विरोधी पक्षांनीही अधिक आक्रमक मागणी करणे गरजेचे होते. काँग्रेस हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे समजते, मात्र इतर विरोधी पक्ष या विषयावर काय करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications