मुंडे म्हणाले, मातीला बदनाम करु नका; दमानिया म्हणाल्या, आम्ही माती पवित्र करतोय, राजीनामा द्या
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही शांत होताना दिसत नाही. काल जाहीर झालेल्या पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं. त्यालाही संतोष देशमुख हत्या प्रकरण हेच कारण होतं, हेही जगजाहीर आहे. आता या पालकमंत्री नाट्यानंतर अंजली दमानिया व मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले होते मुंडे?
पालकमंत्रीपदाच्या यादीतून नाव वगळल्यानंतर धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, "हे सगळं खोटं आहे. प्रत्येक गोष्ट खोटी आहे. प्रत्येक आरोप खोटा आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप त्यांनी (विरोधकांनी) खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर बोलायचं नाही. सध्या मी त्यावर काही बोलणारही नाही. जेव्हा मला त्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही हे तुम्ही सगळेजण जाणता. सध्याची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातील नागरिकाला आणि या मातीतील माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. तसेच माझ्यावर किंवा इतर कोणावर आरोप करायचे असतील तर खुशाल करावे, परंतु माझ्या बीड जिल्ह्याची व इथल्या मातीची बदनामी करू नका".
धनाजय मुंडे, बीड च्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराड नी केली, सुदर्शन घुले नी केली, विष्णू चाटे नी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ….. जाऊ द्या बोलवत नाही
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 19, 2025
बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय…
दमानिया यांनी दिलं उत्तर
धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडीयावर त्यांनी म्हटलं आहे की, "धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली. सुदर्शन घुले व विष्णू चाटेने केली. संतोष देशमुखांसारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने केली, जाऊ द्या. मला त्यावर फार बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून आम्ही ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाले होते ते वाचा. 'राज्यातील एका जिल्ह्यात चालू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होतं आहे', असं तुमच्याच पक्षातील लोक म्हणाले आहेत. 'बीड हत्याकांड प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यायला हवा'. आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नाही. ही वक्तव्ये पाहून आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा".


Click it and Unblock the Notifications
