पुणे, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र का लढणार? अंजली दमानियांनी सांगितलं कारण, केला मोठा आरोप
Anjali Damania Slam Devendra Fadnavis : "महानगरपालिका निवडणुका म्हणजे जनतेची सेवा नव्हे, तर 'लुटण्याचे वाटे' आहेत!" अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुतीच्या रणनीतीचे वाभाडे काढले आहेत. मुंबई, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी पक्षांनी आपापसात 'लूट' वाटून घेतल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल केला आहे.
विधानसभेत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारी राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र कशी? आणि फडणवीसजी, ही तुमची 'मैत्रीपूर्ण लढत' म्हणजे नेमका कोणता खेळ आहे? असा बोचरा सवाल दमानिया यांनी विचारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

'मुंबई भाजपला, ठाणे शिंदेंना आणि पिंपरी राष्ट्रवादीला'
दमानिया यांनी महायुतीमधील जागावाटपाच्या गणितावर भाष्य करताना म्हटले की, भाजपला मुंबईत ठाकरेंविरुद्ध लढण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या समर्थनाची गरज आहे. त्या बदल्यात भाजपने ठाणे शिंदे गटाला 'लुटण्यासाठी' देऊन टाकले आहे. दुसरीकडे, अजित पवारांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका लुटायला मिळावी, म्हणून त्यांनी मुंबई महापालिकेवरील दावा सोडल्याचे दमानिया यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केले.
महानगरपालिका निवडणूक म्हणजे …..
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 16, 2025
वाटे केले गेले लुटण्याचे .
मुंबई मनपा मधे भाजप लुटणार
ठाण्यात शिंदे गट लुटणार आणि
पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊन लुटणार.
भाजपला मुंबईत ठाकरेंविरुद्ध लढायला शिंदेंच्या समर्थनाची गरज आहे, त्या बदल्यात त्यांना ठाणे देऊन टाकले आणि… pic.twitter.com/e1Cb7SrtkV
नवाब मलिकांचा वापर आणि राष्ट्रवादीची 'कमाल'
अजित पवारांना मुंबईतून बाहेर ठेवण्यासाठी नवाब मलिकांचे कारण पुढे करण्यात आले, असा दावा करत दमानिया यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले. "राष्ट्रवादी तर कमालच आहे! विधानसभेत विरोधात लढतात, पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र एकत्र येतात. फडणवीसजी, या 'मैत्रीपूर्ण लढत' या वाक्याचा अर्थ आम्हाला तरी नाही कळला," असा खोचक सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
"मतांची विभागणी कशी होईल?"- दमानियांचा सवाल
पिंपरी-चिंचवडमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दमानिया यांनी थेट फडणवीसांना लक्ष्य केले. "पिंपरी-चिंचवडला आम्ही एकत्र लढलो तर मतांची विभागणी होईल, असे फडणवीस म्हणतात. पण ती विभागणी नेमकी कशी होईल? हे आम्हाला अजिबात समजले नाही," असे म्हणत त्यांनी महायुतीच्या रणनीतीवर शंका उपस्थित केली आहे. एकूणच, महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेच्या पैशांची लूट करण्यासाठीच हे सर्व पक्ष एकत्र आले असल्याचा खळबळजनक आरोप दमानिया यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.












Click it and Unblock the Notifications