नुसते मुंडेच नाहीत, धस, आव्हाड, क्षीरसागरही त्याच प्रवृत्तीचे; अंजली दमानियांचा नेमका आरोप काय?
अंजली दमानिया यांचे सध्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक आंदोलन सुरु आहे. रोज सकाळी दोन तास त्या आंदोलनाला बसत आहेत. बीडच्या लोकांनी मुंडे, कराड यांच्याविरुद्धचे पुरावे आणून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, आपल्या आंदोलनाविषयी त्यांनी आज मोठं वक्तव्य केलं. बीडमध्ये नुसती मुंडे यांचीच दहशत नाही तर आंदोलनात सहभागी झालेले जितेंद्र आव्हाड, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हेही त्याच प्रवृत्तीचे आहेत, असा थेट आरोप दमानिया यांनी केला. त्यामुळेच मी त्या मोर्चात सहभागी झाले नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बीड पोलिसांची नोटीस
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. याबाबत आता पोलिसांनी दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. जो दावा त्यांनी केलाय त्याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. ज्या मोबाईल नंबरवरुन व्हाईस मॅसेज आलेत, तो मोबाईल नंबर, मॅसेज आणि इतर माहिती तातडीने द्यावी, असेही नोटीसीत सांगण्यात आले आहे.
दमानिया यांचा आरोप
बीडमध्ये सर्वपक्षियांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या मोर्चात आपण का सहभागी झालो नाही, याची माहिती दमानिया यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्या म्हणाल्या, या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत असं मला कळालं होतं. शिवाय जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हेही मोर्चात होते. हे सगळे लोक एकाच प्रवृत्तीचे आहेत. त्यांचीही दादागिरी आहे. आरोपींपुढे त्यांची दादागिरी छोटी पडते म्हणून ही लोक लढताहेत का..? असा प्रतिप्रश्न करत दमानिया यांनी हे लोक स्वतःची पोळी भाजून घेत असल्याचाही आरोप केला.
सर्वांनी लढा द्या
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मी मागे खडसेंविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी मी माळी समाजाच्या विरोधात आहे, असा प्रचार केला गेला. आताही मला काहीतरी बोलतील. पण मी जे बोलतेय ते खरं आहे की नाही, ते सांगा. मी एकटी सगळीकडे पोहचू शकणार नाही. माझ्यासारख्या २००-३०० अंजली तयार व्हायला हव्यात. तेव्हा कुठे हा लढा देता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.












Click it and Unblock the Notifications