राजकीय भूकंप! अहिल्यानगर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरावर पोलिसांचा छापा! प्रकृती बिघडली
Ahilyanagar Shiv Sena News : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने अचानक छापा टाकला.
या अनपेक्षित कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या धक्क्याने अनिल शिंदे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने शहरातील आनंद ऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताफ्याने अनिल शिंदे यांच्या घरावर धडक दिली. निवडणूक आयोगाच्या पथकासह आलेल्या या पथकाने घराची कोनाकोपरा तपासला. अगदी किचनपर्यंत सर्व वस्तूंची उलथापालथ करण्यात आली. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या या शोधमोहिमेत पोलिसांच्या हाती नेमके काय लागले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कुटुंबीयांचा आणि शिवसेनेचा संताप
या घटनेनंतर अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. केवळ मानसिक त्रास देण्यासाठी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दबाव निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. कारवाई दरम्यान अनिल शिंदे यांचा रक्तदाब (BP) अचानक वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
'विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली' - शिवसेनेचा प्रहार
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर लढवत आहे. या निर्णयामुळे महायुतीतील मित्रपक्षांसह विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेना संपर्क प्रमुख संजीव भोर यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
संजीव भोर यांची आक्रमक प्रतिक्रिया
"पोलीस आणि प्रशासन विशिष्ट नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असून शिवसेनेच्या उमेदवारांवर दडपशाही केली जात आहे. अनिल शिंदेंच्या घराची पूर्ण झडती घेतली, पण पोलिसांना काहीही सापडले नाही. विशेष म्हणजे, शिंदेंच्या घरासमोरच दुसऱ्या एका उमेदवाराचे घर आहे, तिथे शेकडो लोकांची गर्दी असतानाही प्रशासनाने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. हा स्पष्टपणे पक्षपातीपणा आहे."
प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप
शिवसेनेने असाही आरोप केला आहे की, जेव्हापासून त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, तेव्हापासून त्यांच्या उमेदवारांना प्रचार पत्रके वाटू दिली जात नाहीत आणि त्यांच्या मागे गुंड पाठवले जात आहेत. "अहिल्यानगरचा इतिहास आहे की, जेव्हा जेव्हा प्रशासनाला हाताशी धरून दडपशाही होते, तेव्हा तेव्हा मतदार शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो," असेही भोर यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications