Amravti Airport : अमरावती ते मुंबई फक्त 2 तासांत, विमानतळाचं लोकार्पण, प्रवासी विमानसेवा सुरु
अमरावती विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या विमानतळाचे उद्घाटन केले. ज्यामुळे विदर्भातील हा भाग हवाई संपर्काने जोडला गेला आहे. बेलोरा येथील हे विमानतळ शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे, आज सकाळी 11:30 वाजता पहिले व्यावसायिक विमान मुंबईकडे रवाना झालं. या नवीन विमानसेवेमुळे प्रवासी आणि व्यापारासाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
उद्घाटन आणि पहिले विमान
अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचे सुरक्षितरित्या उतरलं. मुंबईवरुन सकाळी 8.30 सुमारास उड्डाण करणारं विमान अमरावती विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उतरलं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी विमानसेवेच लोकार्पण केले. त्यानंतर एअर इंडिया एफटीओच्या डेमो फ्लाईटचे अमरावती विमानतळावर उड्डाण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या एअर इंडिया विमान प्रशिक्षण संस्थेच्या (FTO) डेमो विमान उड्डाण प्रात्यक्षिकासाठीच्या विमानाला झेंडा दाखवला.

यावेळी केंद्रीय मंत्री किंजारापू राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन यांची उपस्थिती होती.
400 कोटींची गुंतवणूक
सुमारे 400 कोटींच्या गुंतवणुकीसह उभारले जाणारे हे केंद्र, 2025च्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर दक्षिण आशियातील सर्वात मोठे FTO असेल. या विमान प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून 3,000 पेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तसेच याठिकाणी दरवर्षी 180 वैमानिकांचे प्रशिक्षण होईल.
वेळापत्रक आणि नियमित सेवा
एअरलायन्स अमरावती आणि मुंबई दरम्यान नियमित विमानसेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातील तीन दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वेळापत्रकानुसार, मुंबईहून अमरावतीला दुपारी 2:30 वाजता विमान निघेल. सायंकाळी 4:20 वाजता अमरावतीत दाखल होईल.
तिकीट दर
अमरावती ते मुंबई या मार्गासाठी तिकीट दर सुमारे 2,100 इतका निश्चित करण्यात आला आहे. हा दर प्रवाशांसाठी परवडणारा असून, विमान प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर होईल.
अमरावती विमानतळावर काय सुविधा आहेत?
अमरावती विमानतळावर 1850 मीटर लांबीची धावपट्टी असून रुंदी 45 मीटर इतकी आहे. 100 मीटर x 110 मीटरच्या एप्रॉनवर दोन ATR-72 किंवा समान प्रकारच्या विमानांना पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. टर्मिनल इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे, प्रतीक्षा कक्ष आणि सुरक्षा तपासणी केंद्रे आहेत.
26 मीटर उंचीचा वायुयान नियंत्रण टॉवर (ATC) विमानांच्या सुरक्षित उतारण-प्रस्थानासाठी महत्त्वाचा आहे. याशिवाय एअर इंडियाने येथे उभारलेले उड्डाण प्रशिक्षण केंद्र (FTO) 2025 अखेरीस पूर्ण होईल, जे दक्षिण आशियातील सर्वात मोठे असेल आणि दरवर्षी 180 व्यावसायिक वैमानिक तयार करेल. या केंद्रासाठी 200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होत आहे.
या विमानसेवेमुळे विदर्भाच्या विकासाला गती
या विमानसेवेमुळे अमरावती आणि विदर्भातील इतर भागांना मोठा आर्थिक लाभ होईल. व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल, विशेषतः मेळघाट वन्यजीव अभयारण्य आणि अंबादेवी मंदिरासारख्या पर्यटनस्थळांना. रस्ते किंवा रेल्वेने 8 तास लागणारा प्रवास आता 1.5 तासांत होईल, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाचेल.
स्थानिक उद्योजकांना होणार लाभ
स्थानिक उद्योजक आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची वाहतूक जलद गतीने करता येईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ होईल. तसेच, विमानतळामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक तरुणांना फायदा होईल. UDAN योजनेंतर्गत हे विमानतळ सरकारच्या प्रादेशिक विकास धोरणाचा भाग आहे.












Click it and Unblock the Notifications