मोठी बातमी ! शिंदे गटाच्या आमदाराच्या कानशिलात लगावली, प्रचंड तणाव; नेमकं काय घडतयं?
संगमनेर तालुक्यात राजकीय संघर्ष विकोपाला गेला असून, शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सार्वजनिक कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीने आमदार खताळ यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर खताळ यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले, ज्यामुळे काही काळ शहरात गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोराला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
विखे पाटलांकडून हल्ल्याचा निषेध
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पोलिसांना या हल्ल्यामागील सूत्रधारांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय भाषेत बोलताना विखे पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला. "काही लोकांना लोकशाही मान्य नसेल आणि त्यांना 'ठोकशाही' हवी असेल, तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील", असे ते म्हणाले.
विखे पाटील यांनी हल्ल्यामागे कुणाचा हात आहे, याचा तपास करण्यावर भर दिला. "हा भ्याड हल्ला कुणाच्या सांगण्यावरून झाला आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा हल्ल्यांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. तो दूर करायला वेळ लागणार नाही", असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या घटनेमुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण आणखी तापले असून, पुढील काळात राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications