अंबादास दानवेंची दिलगिरी, नीलम गोऱ्हे निलंबन मागे घेणार?
मुंबईः भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. यानंतर अंबादास यांच्या निलंबनाची मागणी भारतीय जनता पक्षासह महायुतीतील घटक पक्षांनी लावून धरली होती.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केले होते.
दरम्यान, या प्रकरणावर माफी मागणार नाही असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अंबादास दानवेंनी घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे.

यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
दिलगिरी व्यक्त करणारं पत्र उपसभापतींना दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दानवे म्हणाले, त्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका मांडली आहे. माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सभागृहाचं पावित्र्य राखताना माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल. हे पावित्र्य राखण्यासाठी माझी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी असल्याची भूमिका दानवेंनी मांडली.
आधी माफी मागणार असा पवित्रा घेतलेल्या दानवेंच्या दिलगिरीच्या पत्रामुळे विरोधकांनीही दानवेंवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना दानवे म्हणाले, माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने माफी मागणं हा त्यांच्या संस्कृतीचा आणि शिकवणीचा भाग आहे. परंतु, ज्या लोकांना संस्कृती आणि शिकवण दोन्ही नाही, जे लोक नेहमी स्वतःच्या मस्तीत फिरत असतात त्यांनी यावर बोलू नये असा टोला दानवेंनी लगावला.
दानवेंनी पत्रात काय लिहिलं?
दानवेंनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याता आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दि.१ जुलै २०२४ रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले.
सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम रहावे हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही.
सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता भगिणींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, अशी विनंती अंबादास दानवे यांनी पत्रातून केली आहे. यामुळे आता नीलम गोऱ्हे काय भूमिका घेतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications