मनुस्मृतीबाबत अजित पवारांच मोठं विधान, बघा काय म्हणाले अजितदादा
Mumbai: राज्य सरकार शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार असल्याचे विरोधकांकडून सातत्याने सांगितले जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा एकही श्लोक समाविष्ट केलेला नाही.
राज्यात मनुस्मृती श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नसल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश हा महाराष्ट्रात मोठा मुद्दा बनला आहे. या प्रकरणामुळे विरोधकांना राजकीय मुद्दा मिळाला आहे . राज्य सरकार मनुस्मृतीच्या श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचे विरोधक सातत्याने सांगत आहेत. तर दुसरीकडे सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले असून हे आरोप फेटाळले आहेत.
मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. तसेच 'महाराष्ट्रात मनुस्मृतीला स्थान नाही' असे अजित पवारांनी ठोसपणे सांगितले आहे.
यापूर्वीही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर स्पष्टीकरण देत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार नाही असे सांगितले होते. तसेच असा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, असेही ते म्हणाले होते.
यावर अजित पवारांनीही आता भाष्य केलयं. महाराष्ट्रात मनुस्मृतीला स्थान नसल्याचे सांगत एका वाक्यात त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
यामुळे झाले होते आरोप
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (SCF) चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) सह संरेखित केल्यानंतर 'इंडिया नॉलेज सिस्टम' (IKS) चा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात संतांच्या जीवनाबरोबरच भगवद्गीता आणि मनस्मृतीच्या श्लोकांचाही अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले.
अजित पवारांकडून खुलासा
अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "शालेय अभ्यासक्रमात 'मनुस्मृतीचा' एकही श्लोक समाविष्ट केलेला नाही. राज्यात मनुस्मृती श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पवार म्हणाले की, मनुस्मृतीला राज्य सरकारचा पाठिंबा नाही.
'मनुस्मृती'सारख्या मुद्द्यांना महाराष्ट्रात अजूनही स्थान नाही हे विरोधकांना माहीत आहे, असे मुद्दे उपस्थित करून विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.
अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला
विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार म्हणाले, "असे राजकारण करणे योग्य नाही, महाराष्ट्र हे सहन करू शकत नाही." पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांच राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे मनुस्मृतीचा स्थान देण्याचा प्रश्नच नाही असा पुनरुच्चार पवारांनी केला.
तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यापूर्वीच याप्रकरणी स्पष्टीकरण दिल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.












Click it and Unblock the Notifications