'अजित पवारांचा मृत्यू अपघात नव्हे, 100% घातपातच!'; AAIB च्या अहवालावर या नेत्याचा घणाघाती आरोप
Vijay Wadettiwar on Ajit Pawar plane crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला असतानाच, आता त्यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावरून राजकीय वादळ उठले आहे. विमान अपघात तपास ब्यूरोने (AAIB) सादर केलेला प्राथमिक अहवाल हा 'मॅनेज्ड' असून, अजित पवारांचा अपघात झाला नसून तो १०० टक्के 'घातपात' असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

AAIB चा 'झाडाची धडक' हा निष्कर्ष 'तकलादू'
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यावर AAIB ने आपला २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर कोसळले, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
यावर कडाडून टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "AAIB अशी तकलादू थेअरी मांडत असेल, तर त्यातूनच स्पष्ट होते की हा अपघात नाही. तब्बल एका महिन्यानंतर असा अहवाल येतो, यातच अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विमान हवेतच उलटल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले असताना, झाडाला अडकून कोसळल्याचे सांगणे म्हणजे सत्य दडपण्याचा प्रकार आहे. हा अहवाल पूर्णपणे ठरवून दिलेला (Managed) आहे."
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे आणि त्रुटी
AAIB ने आपल्या अहवालात अपघाताची काही तांत्रिक कारणे दिली आहेत, जी खालीलप्रमाणे आहेत.
दृश्यमानतेचा अभाव: बारामती विमानतळावरील कमी दृश्यमानता (Low Visibility).
नियमांचे उल्लंघन : व्हीएफआर (Visual Flight Rules) नियमांकडे दुर्लक्ष.
अपुऱ्या सुविधा : विमानतळावर स्वतंत्र MET (हवामान) सुविधेचा अभाव.
अपघाताचा क्रम : लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर विमानाने 'गो अराऊंड' केले, मात्र दुसऱ्या प्रयत्नात ते धावपट्टीपासून ५० मीटर अंतरावर कोसळले. कोसळण्यापूर्वी कॉकपिटमधून 'ओह शिट' असा शेवटचा आवाज ऐकू आल्याचेही अहवालात नमूद आहे.
रोहित पवारांचाही गंभीर आक्षेप; अहवालाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
केवळ वडेट्टीवारच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनीही या अहवालातील चुकांकडे लक्ष वेधले आहे. अहवालाच्या पान क्रमांक ४ वरील एका वाक्याचा संदर्भ देत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले.
रोहित पवार म्हणाले की, अहवालात "Baramati Airfield is situated in the Baramati District" असे म्हटले आहे, तर प्रत्यक्षात बारामती हा जिल्हा नसून तालुका आहे. ही साधी चूक AAIB ने हा तपास किती गांभीर्याने केला आहे, हे दर्शवण्यासाठी पुरेसे आहे. CID या त्रुटी असलेल्या अहवालावर आधारित तपास कसा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजकीय वर्तुळात खळबळ
अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याच्या मृत्यूबाबत विरोधी पक्षांनी 'घातपाताचा' संशय व्यक्त केल्यामुळे आता राज्यातील वातावरण तापले आहे. "या अहवालावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे," अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली असून, आगामी काळात हा मुद्दा विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे. सत्य शोधण्यासाठी उच्चस्तरीय फेरचौकशी होणार का? की हा अहवालच अंतिम मानला जाणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications