'लय चुरूचुरू बोलू नकोस', 'भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास'; अजितदादांचा रोहित पवारांना दम
Ajit Pawar on Rohit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असलेले काका-पुतणे म्हणजेच अजित पवार आणि रोहित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांच्यातील राजकीय जुगलबंदीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.
इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते, तसेच जयंत पाटील एकत्र आले होते. रोहित पवारांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना 'भावकी'वरून टोला मारताच, अजित पवारांनीही त्यांना त्यांच्याच शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले.

टोला आणि पलटवार
कार्यक्रमात पहिल्यांदा बोलताना आमदार रोहित पवार यांनी उपस्थितांना हसवत म्हटले, "दादा (अजित पवार) गावकीचा विचार करतात, पण भावकीला विसरले." हा टोला ऐकून अजित पवार यांच्यासह व्यासपीठावरील सर्वांना हसू आवरता आले नाही. पण, रोहित पवारांनी केलेल्या या फटकेबाजीनंतर जेव्हा अजित पवार बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनीही तेवढ्याच हजरजबाबीपणे उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, "मगाशी बोलत असताना रोहित म्हणाला की दादांचं गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे लक्ष नाही. अरे, भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास!" पुढे जयंत पाटील यांच्याकडे पाहून ते म्हणाले, "बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, जयंत पाटील जरा त्यांना सांगा."
📍सांगली ⏭️ 16-08-2025
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 16, 2025
➡️ प्रा एन डी पाटील महाविद्यालय - संशोधन केंद्र व बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा - लाईव्ह https://t.co/t0IC8iQihU
'माझ्या नादाला लागू नका!'
अजित पवारांनी रोहित पवारांना नुसतं प्रत्युत्तरच दिलं नाही, तर त्यांना हसत हसत 'माझ्या नादाला लागू नका' असा इशाराही दिला. त्यांनी पुढे म्हटले, "मी महायुतीमध्ये गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुमच्या तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात आणि मी माझ्या विचाराने चाललो आहे."
याचवेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरही कोपरखळी मारली. "जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व, आणि आम्ही काही देखणे नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची," असं म्हणताच एकच हशा पिकला.
अजित पवार यांच्या या मिश्किल बोलण्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण हलकेफुलके झाले आणि उपस्थित प्रेक्षकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता असली तरी, अशा प्रसंगांमुळे नेत्यांमधील वैयक्तिक संबंध किती सौहार्दपूर्ण आहेत हे दिसून येते.












Click it and Unblock the Notifications