"इजा, बिजा झाली, तिजाची वेळ आणू नका", कोकाटेंचा निर्णय सोमवारी होणार? अजितदादा काय म्हणाले...

विधानसभेच्या सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा परिसर सभापती राम शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारीत असून, ते या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे पवार यांनी सांगितले. कोकाटे यांच्या राजीनाम्यावर थेट बोलणे टाळत, अजित पवारांनी सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटे यांच्याशी भेट घेतल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

ajit pawar on kokate

"दोनदा समज दिली होती..."

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "मी कोकाटे यांचा खुलासा ऐकला आहे, ज्यात त्यांनी 'मी खेळत नव्हतो' असे म्हटले आहे." देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर, सर्व मंत्र्यांशी चर्चा करून प्रत्येकाने आपल्या वर्तनाचे भान ठेवले पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या, असेही त्यांनी नमूद केले. कोकाटे यांच्या संदर्भात यापूर्वीही असेच काही प्रसंग घडले होते. "पहिल्यांदा घडले तेव्हा मी समज दिली होती. दुसऱ्यांदा घडले तेव्हाही समज दिली होती. त्यावेळी मी त्यांना 'इजा, बिजा झाली, तिजाची वेळ आणू नका' असे सांगितले होते," असे पवार यांनी आठवण करून दिले. आता समोरासमोर चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर देताना सांगितले.

मंत्र्यांनी भान ठेवावे: अजित पवार

कोणताही मंत्री असो, सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाने तारतम्य बाळगले पाहिजे. स्वतःला काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. सरकारमधील मंत्र्यांच्या आपापसातील वादांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील. महायुतीत काम करताना कोणत्याही नेता किंवा मंत्री-राज्यमंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारला कमीपणा येऊ नये, हे महत्त्वाचे आहे. हे तीन पक्षांचे सरकार असून, कुणाकडून काही वाद झाल्यास संबंधित पक्षाची नैतिक जबाबदारी असते आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेऊ शकतात, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

लातूर घटनेवर त्वरित कारवाई

यावेळी अजित पवारांनी लातूरमधील मारहाणीच्या घटनेचाही उल्लेख केला. "मला या घटनेबाबत कळताच मी ताबडतोब ट्विट करून माझी भूमिका स्पष्ट केली. संबंधित पदाधिकाऱ्याला राजीनामा देण्याचे आदेश दिले," असे त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या शिकवणीला गालबोट लागू नये, यासाठी ही कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले.

"हा महाराष्ट्र, इथं आधी मराठी मग बाकी..."

मराठी-हिंदी वादावरही अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "सगळ्यांनी आपापलं भान ठेवलं पाहिजे. प्रत्येक राज्यात त्यांची मातृभाषा महत्त्वाची असते. भारतात त्या त्या राज्याची मातृभाषा वगळली तर दुसरी भाषा हिंदी चालते. तिसरी भाषा इंग्रजी चालते," असे ते म्हणाले. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबाबत आदर असला पाहिजे आणि ती टिकली पाहिजे.

मात्र, महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोलता येत नसेल तर ती शिकण्याचा प्रयत्न करावा, "मी बोलणारच नाही" अशी भाषा वापरू नये. "जिथे तुम्ही राहता तिथली भाषा, माणसांचा विचार करायला हवा. आम्ही मराठीचा आदर करू, मराठी शिकू असं बोलले तर समस्या येणार नाही. हा महाराष्ट्र आहे. इथं पहिले मराठी चालते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आधी मराठी मग बाकी अशी भूमिका," अजित पवारांनी ठामपणे मांडली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+