मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली: एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरले, टायर फुटले, कसा घडला थरार?
Mumbai airport Air India plane skids off the runway : केरळच्या कोचीहून मुंबईला आलेले एअर इंडियाचे AI2744 विमान आज (सोमवार, 21 जुलै) सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. यात तीन चाके निखळले त्यामुळे एकच थरार घडला.
सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि विमानातील सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप आहेत. परंतु, या घटनेने काही काळ विमानतळावर एकच थरार उडाला. नेमकी ही घटना कशी घडली अन् काय उपाययोजना करण्यात आल्यावर एक नजर टाकूया.
नेमकी काय घडली घटना?
आज सकाळी कोचीहून मुंबईकडे येणारे एअर इंडियाचे AI2744 विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. पावसामुळे रनवेवर पाणी साचले असल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. विमान काही क्षण अनियंत्रित झाले असले तरी, वैमानिकाने त्वरित परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि विमान सुरक्षितपणे लँड केले.
या घटनेनंतर, विमान कंपनीने तात्काळ कार्यवाही करत विमानाला सुरक्षितपणे हँगरपर्यंत पोहोचवले. सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना विमानातून उतरवण्यात आले आहे. पुढील तपासणीसाठी आणि आवश्यक सुरक्षा तपासण्यांसाठी विमान आता ग्राऊंड करण्यात आले आहे.

पावसाचा विमानसेवेवर परिणाम
मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे रनवेवर काही ठिकाणी पाणी साचले आहे, ज्याचा परिणाम विमानसेवेवर होत आहे. अनेक विमाने रद्द करण्याची वेळ आली आहे, तर काही विमानांना विलंबाने उड्डाण करावे लागत आहे किंवा लँडिंगमध्ये अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत ही धावपट्टीवरून घसरण्याची घटना घडली आहे, ज्यामुळे पावसाळ्यातील विमान प्रवासातील आव्हाने अधोरेखित झाली आहेत.

एअर इंडियाने निवेदनात काय म्हटले?
एअर इंडियाने या घटनेबद्दल सांगितले की सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. ' 21 जुलै रोजी कोचीहून मुंबईला जाणारे विमान AI2744 मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. चौकशीसाठी विमान तात्पुरते ग्राउंड करण्यात आले आहे.
मुंबई एअरपोर्टने काय केला खुलासा?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) कडून देखील या घटनेसंदर्भात एक निवेदन जारी केले. CSMIA ने म्हटले आहे की, '21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:27 वाजता कोचीहून येणारे एक विमान लँडिंग करताना मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरले. घटनेनंतर लगेचच, CSMIA ची आपत्कालीन प्रतिसाद पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना विमानातून ताबडतोब बाहेर काढण्यात आले. ते सर्व सुरक्षित आहेत. मुख्य धावपट्टी 09/27 ला किरकोळ नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. कामकाज सुरू राहावे यासाठी, दुय्यम धावपट्टी 14/32 सक्रिय करण्यात आली आहे. CSMIA मध्ये सुरक्षितता ही नेहमीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते.
अहमदाबादेत घडला होता भीषण अपघात!
गत महिन्यात गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एक विमान उड्डाणानंतर अवघ्या ३९ सेकंदांतच कोसळले होते, ज्यात जवळपास 270 जणांचा बळी गेला होता. हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने झेपावले होते आणि विमानतळ परिसरातील एका मेडीकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले होते.
मुंबईतील ट्रक धडकेची घटना
गेल्या सोमवारी (14 जुलै रोजी) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाईन्सच्या विमानाला धडक दिली होती. यात विमानाचे अंशतः नुकसान झाले होते. सुदैवाने, त्यावेळी विमान चालू नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.












Click it and Unblock the Notifications