एका आवाहनावर जमले हजारो मुस्लिम बांधव, पण जलीलांच्या 'तिरंगा संविधान रॅली'ला मुंबईत प्रवेश नाही
Imtiaz Jaleel : एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आणि हजारो मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई व्हावी या मागणीसाठी 'तिरंगा संविधान रॅली' काढली. सोमवारी दुपारी हजारो वाहनांतून छत्रपती संभाजीनगरहून निघालेल्या मुस्लिम बांधवानी मुंबईत प्रवेश करण्यासाठी मुलुंड टोल प्लाझा गाठला.
मात्र त्यांना मुंबईत प्रवेश दिला गेला नाही. मुलुंड टोलनाक्यावर उपस्थित विभागीय जिल्हाधिकारी आणि इतर प्रतिनिधींना निवेदन देऊन सोमवारी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांच्यासह वाहनांचा ताफा परत माघारी फिरला.

जलीलांना मुंबईत मिळाला नाही प्रवेश
छत्रपती संभाजीनगर येथून 'तिरंगा संविधान रॅली' या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मराठवाड्यातील विविध भागातून शेकडो वाहने संभाजीनगर येथे पोहोचून समृद्धी सुपर एक्स्प्रेस वेने मुंबईच्या दिशेने निघाली, त्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी सांगितले की, निषेध रॅलीत सहभागी झालेल्या वाहनांमुळे समृद्धी एक्सप्रेसवे जाम होण्याची ही पहिलीच वेळ होती. जलील यांनी रामगिरी महाराज आणि नितीश राणे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला आणि त्यांच्या अटकेची मागणी केली.
सत्ताधारी महायुतीचे सदस्य आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्याची योजना त्यांनी आखली. तथापि, मुंबई पोलिसांनी सांगितले की जलील यांना शहरात प्रवेश दिला गेला नाही आणि मुंबईतील मुख्य प्रवेश द्वार असलेल्या मुलुंड टोल नाक्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले. टोल नाका आणि संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तीन हजारांहून अधिक पोलीस तैनात करून वाहतूक वळवण्यात आली.
दलित आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांचीही वाहने
पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, त्यांनी पुष्टी केली की सोमवारी रात्री सरकारी प्रतिनिधींना जलील यांचे पत्र सुपूर्द केल्यानंतर जमावाने माघार घेतली. सुमारे 2,000 वाहने या या रॅलीत होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुस्लिमांच्या रॅलीमध्ये दलित आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांची वाहने देखील सामील होती.
समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच वाहतूक कोंडी
संभाजीनगर येथून हर्सूल सावंगी जंक्शनमार्गे वाहने दाखल झाल्यानंतर द्रुतगती मार्गावर प्रथमच वाहतूक कोंडी झाली. मुलुंड नाक्यावर पोहोचेपर्यंत खाजगी बस आणि मिनी ट्रकसह अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती होती, जिथे पोलिसांनी प्रवेश बिंदूवर बॅरिकेड केले होते. कोणताही धोका न पत्करता संभाजीनगर पोलिस तसेच राज्य गुप्तचर विभागाने रॅलीसह त्यांचे पथक तैनात केले. मुंबई पोलिसांनी केलेल्या बंदोबस्तानुसार या ताफ्याला मुलुंड नाक्यावर थांबवून माघारी फिरण्यास सांगण्यात आले.
जलील यांची 'ही' प्रमुख मागणी
ठाण्यातील मुंब्रा येथे पोहोचल्यानंतर मुंबईकडे निघताना जलील म्हणाले, "आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (फडणवीस) यांच्याशी बोलणार आहोत, ज्यांच्याकडे गृहखात्याचाही कार्यभार आहे, हे त्यांचे कर्तव्य आहे, याची आठवण करून देऊ कायद्याचे राज्य सुनिश्चित करण्यासाठी आमचा निषेध रामगिरी महाराज आणि नितीश राणे यांच्या विरोधात आहे, ज्यांच्या विरोधात जातीय भावना भडकावल्याबद्दल आणि द्वेषपूर्ण भाषणे केल्याबद्दल अनेक एफआयआर नोंदवले गेले आहेत."












Click it and Unblock the Notifications