शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, या तारखेपासून मान्सून थंडावणार, पावसातही घट; कृषी विभागाची सूचना
Agriculture Department Appeal : महाराष्ट्रातील कोकणात मान्सूनने तब्बल दहा दिवस आधीच हजेरी लावली आहे. सध्या कोकण आणि मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे, असे असले तरीही कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वपूर्ण सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करु नये असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कृषी विभागाने मोठे कारण दिले आहे.
कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असून राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील असे कृषी विभागाने म्हटले आहे.

मे महिन्याच्या शेवटी वातावरण बदलणार
कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आवाहन करताना सांगितले की, सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.
'..म्हणून पेरणीची घाई करु नका'
या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या गोष्टी आणि माहितीवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी यामध्ये खासकरुन जे कोरडवाहू शेती करता अशांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही कृषी विभागाने म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications