कशाच्या गप्पा झाल्या? आष्टीत हेलिकाँप्टर उतरलं तेव्हाच... जरांगेनी धस-मुंडे भेटीनंतर सगळंच काढलं
महाराष्ट्राच्या राजकारणात कालपासून आ. सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत चांगलीच चर्चा सुरु आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी सुमारे साडेचार तास ही भेट झाल्याचे सांगितले जाते. आता याच भेटीवरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना चांगलंच फटकारलं आहे.

काय म्हणाले जरांगे?
प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, एखाद्या माणसाच्या अंगात इतका वेगळेपणा असू शकतो, हे पहिल्यांदा पाहायला मिळालं. संतोष देशमुखची क्रूर हत्या झाली, याचं त्यांना काही वाटलं नाही. एखादं पद देतील किंवा लाभ होईल, म्हणून तुम्ही भेटता हे चुकीचं आहे. या गुप्त भेटीची माहिती ज्याने बाहेर आणली त्याला मार्क दिले पाहिजे. त्याच व्यक्तीने खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा केला आहे.
राजकीय स्वार्थ काय कामाचा?
जरांगे पुढे म्हणाले, धसांना गुप्तपणे भेटण्याची गरज काय होती..? हा खून दाबण्याचा प्रकार आहे. ते म्हणालेत की, धनंजय मुंडे आजारी होते. त्यांना काय झालं होतं? ते काय कोमात गेले होते का? ते काय समाजापेक्षा मोठे आहेत काय? या मागचा राजकीय स्वार्थ काय? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. डाका टाकणारा चोर साडेचार तास बैठक घेऊन प्लॅन शिजवतोय, असा आरोपही जरांगे यांनी केला.
आता विश्वास कसा ठेवायचा?
जरांगे पुढे म्हणाले की, आम्ही धस यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली होती. सर्व निर्धास्त होतो. पण त्यांनी झोपेतच मान छाटली. हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी मला हे लक्षात आलं होतं. तुम्ही खून पचवणार असाल तर तुमच्यासारखे महापापी नाही. चंद्रशेखर बावनकुळे जर मिटवून घ्या म्हणत असतील, तर धनंजय मुंडे 302च्या प्रकरणात आहेत, असा त्याचा अर्थ होतो. जो माणूस चार घंटे बसून चर्चा करतो, त्याच्यावर आता काय विश्वास ठेवावा? संतोष अण्णा खून प्रकरणं दाबलं गेलं तर त्याला धसच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications