पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी ISI कुणी स्थापन केली? ती कुणी ट्रेन केली? ती भारताविरोधात कशी काम करते?
जम्मू काश्मिरमधील पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्या जगाला धक्का बसला. त्यानंतर भारताच्या गुप्तचर संस्था आणि राॅची चर्चा सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आयएसआयचीही चर्चा सुरु झाली. पाकिस्तानची ही गुप्तचर संस्था अनेकदा अनेक कारणांनी चर्चेत येते. ती अनेकदा बदनामही झाली आहे. याच आयएसआयची आपण आज माहिती घेऊयात...

कधी झाली ISI ची स्थापना?
भारतापासून स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये दोन गुप्तचर संस्था होत्या. त्यात एक होती इंटेलिजन्स ब्युरो, आणि दुसरी होती मिलिटरी इंटेलिजन्स. परंतु त्यानंतर लगेच झालेल्या भारत-पाक युद्धात या दोन्ही संस्था अपयशी ठरल्या. पाकिस्तानचे नौदल, हवाईदल आणि लष्करात माहिती प्रदान करण्यात या दोन्ही संस्थांना अपयश आले. त्यामुळे एक नवी गुप्तचर संस्था स्थापन करण्याची गरज भासू लागली. त्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस म्हणजेच आयएसआयची स्थापना १९४८ मध्ये झाली. ऑस्ट्रेलियन वंशाचे ब्रिटिश लष्करी अधिकारी मेजर जनरल आर. कॅथोम यांनी ती स्थापन केली.
काय आहे संघटनेचा लोगो?
एक साप चावणारा बोकड हा या संघटनेचा लोगो आहे. हा बोकड हिंस्त्र समजला जातो. गिलगिट-बाल्टिस्तान, चित्राल, कलश व्हॅली आणि काश्मीरमधील हुंजा व्हॅली, नीलम व्हॅलीच्या वरच्या भागात तो आढळते. हा बोकड भारताच्या काही भागात तसेच अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तानमध्ये देखील आढळतो. हा हिंस्त्र बोकड पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. तोच या संघटनेच्या लोगोत तोंडात साप चावताना दाखविण्यात आला आहे.
या लोगोचा अर्थ काय?
पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या लोगोमध्ये हिंस्त्र बोकड व साप चावताना दाखविला आहे. त्याची दोन कारणे असल्याचे सांगितले जाते. पहिले कारण म्हणजे, हा बोकड पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे. दुसरे कारण म्हणजे, त्याच्या तोंडात जो साप दाखविण्यात आला आहे तो साप म्हणजे पाकिस्तान विरोधी प्रवृत्ती आहे. पाकिस्तानात राहून पाकिस्तानविरोधी कारवाया करणाऱ्या सापांना मारणे, असा त्या लोगोचा अर्थ असल्याचे सांगितले जाते.
आयएसआय कशी चर्चेत आली?
८० च्या दशकापर्यंत आयएसआय ही गुप्तचर संस्था जास्त चर्चेत नव्हती. भारताविरोधी अनेक दहशतवादी हल्ल्यात आयएसआयचा सहभाग होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएसआय निष्प्रभ ठरली. यानंतर तिची नव्याने पनुर्बांधणी करण्यात आली. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने या एजन्सीला प्रशिक्षण दिल्याचेही सांगितले जाते. त्याच काळात सोव्हिएत सैन्य अफगाणिस्तानात तैनात होते. प्रॉक्सी वॉरद्वारे सोव्हिएत सैन्याचा पराभव करण्यासाठी अमेरिकेने दहशतवादी संघटनांचे जाळे निर्माण करून आयएसआयला बळकटी दिली.
भारताविरुद्ध काय करते?
अमेरिकन गुप्तचर एजन्सीने स्वतःच्या स्वार्थासाठी आयएसआयला सुमारे दोन दशके प्रशिक्षण दिल्याचेही सांगितले जाते. परिणामी आयएसआय इतकी कुशल झाली की आज ती जगातील सर्वात धूर्त आणि कुप्रसिद्ध एजन्सी मानली जाते. गेल्या दोन दशकांमध्ये सीआयएकडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आणि आखाती देशांकडून मिळालेल्या इस्लामिक निधीच्या मदतीने आयएसआयने भारतात दहशतवाद पसरवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आयएसआय काश्मीरमध्ये सतत सक्रिय राहिली. गेल्या अनेक दशकांपासून आयएसआयने काश्मीरमधील तरुणांना दिशाभूल करून नवीन दहशतवादी संघटना निर्माण केल्या. गेल्या दोन दशकांत भारतातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्या कटात आणि रणनीतीमध्ये आयएसआयचा हात राहिला.












Click it and Unblock the Notifications