मोठी बातमी! अमित शहा जम्मूत असतानाच पाकचा घुसखोरीचा प्रयत्न; LOC वर जोरदार धुमश्चक्री, शहा म्हणाले..
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या जम्मू- काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. शहा तेथे असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी संध्याकाळी जम्मूला पोहोचले. या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असे शहा यांनी पत्रकारांना सांगितले.

घुसखोरीच्या शक्यता वाढल्या
पाकिस्तानी सैन्याने आज (सोमवारी) पूंछ जिल्ह्यातील दिग्वार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबारात घुसखोरी होऊ नये, म्हणून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. केवळ घुसखोरीसाठीच पाकिस्तानने कुरापत काढली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
आठवड्यात दोनदा चकमक
यापूर्वी १ एप्रिल रोजी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर भूसुरुंग स्फोटानंतर पाकिस्तानी सैन्याने कोणतेही कारण नसताना गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. भारतीय सैन्याने संतुलित आणि नियंत्रित पद्धतीने प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. पूंछ, राजौरी, कठुआ आणि किश्तवार जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात अतिरेकी सक्रिय असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमध्ये काही विदेशी सैन्य असल्याचेही सांगितले जात आहे.
दहशतवाद्यांचा शोध सुरु
कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय भागात घुसखोरी करणाऱ्या पाच अतिरेक्यांना स्थानिक पोलिसांच्या पथकाने २३ मार्च रोजी हाकलून लावले होते. आंतरराष्ट्रीय सीमेपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सान्याल गावात ही चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, तर चार पोलिस शहीद झाले होते. उर्वरित तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त दलांनी कठुआ आणि राजौरी जिल्ह्यांतील उंच भागात शोध आणि हत्या मोहीम तीव्र केली आहे.
पॅरा कमांडो तैनात
कठुआ जिल्ह्यातील बिल्लावार भागात दहशतवादी आणि संयुक्त दलांमध्ये शुक्रवारी चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात घुसखोरी करण्यासाठी कठुआ जिल्ह्यातील उंच भागांचा वापर करत आहेत. दहशतवाद्यांचे हिट अँड रन हल्ले रोखण्यासाठी या जिल्ह्यांच्या घनदाट जंगलात लष्कराचे सुमारे ४,००० विशेष प्रशिक्षित पॅरा कमांडो तैनात करण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications