2026मध्ये भारत-पाक युद्धाची ठिणगी पडणार?, यांनी केला दावा; काश्मीरातील दहशतवाद ठरणार कारणीभूत!
India-Pakistan War Possible in 2026 Over Kashmir Tensions : दक्षिण आशियातील भू-राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेची प्रतिष्ठित थिंक टँक 'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स' (CFR) ने आपल्या 'कॉन्फ्लिक्ट्स टू वॉच इन २०२६' या अहवालात २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्षाची भीती व्यक्त केली आहे. काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया आणि दोन्ही देशांची शस्त्रास्त्र खरेदी या युद्धाला कारणीभूत ठरू शकते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

युद्धाची शक्यता का वर्तवण्यात आली?
CFR च्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अद्याप शांत असली तरी सीमेपलीकडून होणारी घुसखोरी चिंताजनक आहे.
दहशतवादी सक्रियता : भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, चालू हिवाळ्यात जम्मू प्रदेशात ३० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत.
दहशतवादाचा धोका : काश्मीरमध्ये एखादा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल, ज्यामुळे परिस्थिती पूर्णतः युद्धाकडे वळू शकते.
अमेरिकेवर परिणाम: या संभाव्य संघर्षाचा अमेरिकेच्या जागतिक हितांवरही 'मध्यम' स्तरापर्यंत परिणाम होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.
दोन्ही देशांची युद्धाची तयारी: शस्त्रास्त्रांची मोठी खरेदी
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कराराला (१० मे) वेळ उलटून गेला असला तरी, दोन्ही बाजूने लष्करी ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे.
भारताचे पाऊल : भारतीय संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) नुकतेच ७९ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारांना मंजुरी दिली आहे. यात प्रामुख्याने प्रगत ड्रोन्स, एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे आणि अचूक मारा करणारे गाइडेड बॉम्ब यांचा समावेश आहे.
पाकिस्तानचा प्रतिकार : पाकिस्ताननेही तुर्कस्तान आणि चीनकडून अत्याधुनिक ड्रोन्स आणि 'एअर डिफेन्स सिस्टिम' खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान समोर आलेल्या त्रुटी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
केवळ भारतच नाही, अफगाणिस्तानसोबतही पाकिस्तानचा संघर्ष अटळ?
अहवालात केवळ भारत-पाक नव्हे, तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (तालिबान) यांच्यातही २०२६ मध्ये संघर्षाची शक्यता वर्तवली आहे.
ड्युरंड लाईनवरील तणाव : २६०० किमी लांब ड्युरंड लाईनवर पाकिस्तान आणि तालिबान सैन्यात वारंवार चकमकी होत आहेत. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या सीमा चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या, ज्याचा मोठा परिणाम व्यापार आणि संबंधांवर झाला आहे.
काय आहे 'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स' (CFR)?
CFR ही १९२१ मध्ये स्थापन झालेली अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली थिंक टँक आहे. ही संस्था अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर संशोधन करते. त्यांचे अहवाल थेट व्हाईट हाऊस आणि अमेरिकन काँग्रेसच्या धोरणांवर प्रभाव पाडतात. त्यांनी संघर्षांचे वर्गीकरण टियर-१, २ आणि ३ मध्ये केले असून भारत-पाक तणाव हा गंभीर श्रेणीत ठेवला आहे.
भारत-पाक युद्धाचा इतिहास
भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत ५ वेळा मोठे संघर्ष झाले आहेत, ज्यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला:
- १९४७-४८: काश्मीरमधील पहिले युद्ध.
- १९६५: कच्छचे रण आणि काश्मीरवरून झालेले युद्ध.
- १९७१: सर्वात मोठा पराभव; बांगलादेशची निर्मिती आणि ९१ हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण.
- १९९९: कारगिल युद्ध.
- २०१९: बालाकोट एअर स्ट्राईकनंतर उद्भवलेली युद्धजन्य परिस्थिती.












Click it and Unblock the Notifications