एकीकडे भारतासोबत तणाव असताना पाकच्या बलुचिस्तानात मोठा हल्ला, JUI नेत्यासह तिघे ठार, कसा घडला थरार!
Pahalgam terrorist attack : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध बिघडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे.
एकीकडे अशी भयावह परिस्थिती असताना मात्र, दुसरीकडे पाकिस्तानच्या अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील कलाट जिल्ह्यात एक खाजगी वाहन भूसुरुंगावर आदळल्याने मोठा हल्ला झाला आहे. या दुर्घटनेत पाकिस्तानमधील राजकीय पक्ष असलेल्या जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय) नेते अब्दुल्ला यांच्यासह तीन जण ठार झाले तसेच ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना चोरी बुर कपुटो भागात झाली. जिथे वाहन एका भूसुरुंगावर आदळले. "लावीचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य देखील केले जात आहे.

जेयूआय या संघटनेच्या नेत्याचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील मृतांमध्ये जेयूआय नेते आणि वॉर्ड नगरसेवक अब्दुल्ला यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे. तसेच जखमींना कलाट येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बलुचिस्तान अन् पख्तूनख्वा भागात दहशतवादी हल्ले वाढले
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. याआधी 15 एप्रिल रोजी मास्तुंग जिल्ह्यात बलुचिस्तान कॉन्स्टेब्युलरीच्या वाहनाला लक्ष्य करून झालेल्या स्फोटात 3 पोलिस मृत्यूमुखी पडले आणि 16 हून अधिक जखमी झाले होते.
हे एक दहशतवादी कृत्य
या हल्ल्याच्या घटनेनंतर बलुचिस्तान प्रांताचे प्रवक्ते शाहिद रिंद म्हणाले, हे एक दहशतवादी कृत्य आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. कायदा आणि सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत कायम राखली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी केली.
गैर काश्मिरी नागरिकांवर होते टारगेट
दुसरीकडे, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्लासंदर्भात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या हल्ल्यात 28 जणांना जीव गमावावा लागला. आता सुरक्षा संस्थांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की दहशतवाद्यांनी या हल्ल्याचा प्लॅन केला होता. त्यांचा उद्देश पर्यटन स्थळी गैर-काश्मिरींना लक्ष्य करणे असा होता.
सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पूर्वसूचना मिळाल्या होत्या की, दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एका प्रमुख पर्यटन स्थळाला लक्ष्य करणार आहेत. या माहितीमध्ये, दहशतवादी धार्मिक कारणास्तव कोणत्याही गैर-काश्मीरी नागरिकाला लक्ष्य करू शकतात, असा इशारा देखील देण्यात आला होता.












Click it and Unblock the Notifications