भारताने हल्ला केला किंवा सिंधूचे पाणी अडवले तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ, पाकची पुन्हा पोकळ धमकी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली असून सीमेवर तणाव वाढला आहे. रशियातील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना जमालीने रशियन टेलिव्हिजन चॅनल RT ला दिलेल्या मुलाखतीत ही धमकी दिली.
मोहम्मद खालिद जमाली यांनी दावा केला की, भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत आहे, आणि अशा परिस्थितीत पाकिस्तान अण्वस्त्रचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही. या विधानामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला आहे.

पाकिस्तानी राजदूताची पोकळ धमकी
रशियातील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी 4 मे रोजी रशियन टेलिव्हिजन चॅनल RT ला दिलेल्या मुलाखतीत भारताला थेट अण्वस्त्रांची धमकी दिली आहे. त्याने दावा केला की, भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे लीक झालेल्या कागदपत्रांचा पुरावा आहे. जमाली म्हणाला की, "आमच्याकडे भारताच्या सैन्य कारवाईच्या योजनेचे पक्के पुरावे आहेत. काही लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करण्याची योजना आहे. आम्हाला वाटते की हा हल्ला जवळ आला आहे आणि तो कधीही होऊ शकतो." त्यांनी पुढे सांगितले की, जर भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी रोखले, तर पाकिस्तान अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देईल.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?
जमालीच्या या विधानाला पाकिस्तानातील इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. यापूर्वी 27 एप्रिल रोजी पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनीही असाच इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तानकडे 130 अण्वस्त्र शस्त्रे आहेत आणि ती सर्व भारतासाठीच तयार ठेवली आहेत. त्यांनीही सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका करत युद्धाची धमकी दिली होती. या धमक्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.
भारताने पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली
दरम्यान जमाली याने मुलाखतीत म्हटलं आहे की, दोन्ही देश अणुशक्ती आहेत आणि अशा परिस्थितीत वाढत्या तणावामुळे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येऊ शकतो. त्यांनी काश्मीर हल्ल्याची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आणि त्यात रशिया आणि चीनची भूमिका असू शकते असे म्हटलं आहे. मात्र, भारताने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताने कठोर पावले उचलली
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची पसरली आहे. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा भारत आधीच सीमावर्ती भागात तणावाचा सामना करत होता. भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यासाठी तिन्ही दलांना खूली मोकळीक दिली. यासोबतच त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मदत करणा-यांवर कठोर कारवाई करु, असं म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications