भारतीय सैन्याने परतून लावला पाकिस्तानचा हल्ला; 3 पाकिस्तानी सैनिकांसह सात घुसखोरांचा खात्मा
भारतीय सैन्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सात घुसखोरांना ठार मारले आहे. यामध्ये ३ पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश असल्याचे समजते. ४ फेब्रुवारीच्या रात्री पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीजवळ नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न झाला, तेव्हा ही घटना घडली.

नेमके काय झाले?
पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीजवळ नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्याच्या पुढच्या चौकीवर हल्ला करण्याची अतिरेक्यांची योजना होती. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी आधीच हल्ला करून हा कट उधळून लावला, असे सांगितले जाते. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) चे ३-४ सदस्यही मृत्युमुखी पडले, असेही सांगितले जाते.
दहशतवादी अल बद्र गटाचे
या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी अल बद्र गटाचे सदस्य असू शकतात, असे काही मिडिया हाऊसचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आधीच सांगितले आहे की आम्ही भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू, अशा वेळी घुसखोरीचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.
पंतप्रधानांना करायची होती चर्चा
या कारवाईपूर्वी ५ फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले होते की, पाकिस्तानला काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचे आहेत. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे 'काश्मीर एकता रॅली'ला संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हे विधान केले होते. कलम ३७० रद्द करण्याच्या संदर्भात शरीफ म्हणाले होते की, भारताने ५ ऑगस्ट २०१९ च्या मानसिकतेतून बाहेर पडावे आणि संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि चर्चा सुरू करावी.












Click it and Unblock the Notifications