भारताने धो-धो धुतले तरी देखील पाकिस्तान सुधारणार नाही; काश्मीरबाबत पुन्हा असीम मुनीरने ओकली गरळ!
Asim Munir On Jammu and Kashmir : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने धो-धो धुतले तरी देखील पाकिस्तानातील नेत्यांची खोड काही मोडली नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आपली घाणेरडी सवय काही सोडायला तयार नाही. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्यातील नस असल्याचे म्हणून वर्णन केले. मुनीर म्हणाले की पाकिस्तानच्या लोकांसाठी काश्मीर हा त्यांच्या रक्ताशी जोडलेला मुद्दा आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आधीच तणावपूर्ण झालेले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील तणाव अति टोकाला पोहोचले.
भारताने नेहमीच पाकिस्तानच्या अशा प्रक्षोभक विधानांना तीव्र विरोध केलेला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आज संपूर्ण जग त्याला भारताचा एक भाग म्हणूनच ओळखते.

तर आम्ही भारताला जशास तसे उत्तर देऊ!
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी बनावट आरोप करून बढाई मारण्याचे काम केले आहे. ते म्हणाले, 'भारताने कोणत्याही चिथावणीशिवाय दोनदा पाकिस्तानवर हल्ला केला आहे. हे पाकिस्तानच्या नव्हे तर भारताच्या धोरणात्मक विचारसरणीचा अभाव दर्शवते. आम्हाला सांगायचे आहे की जर भविष्यात भारताने अशी आक्रमकता दाखवली तर पाकिस्तान कडक आणि निर्णायक उत्तर देण्यास सक्षम आहे.'
असीम मुनीर यांनी काश्मीरवर पाकिस्तानी जनतेची दिशाभूल केली. काश्मीर मुद्द्यावर आपल्या देशवासीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी असीम मुनीर म्हणाले की, पाकिस्तानी लोकांचे काश्मीरशी रक्ताचे नाते आहे. ते त्यांच्या काश्मिरी बंधू-भगिनींशी रक्ताने जोडलेले आहेत. त्यांनी काश्मीरचे वर्णन पाकिस्तानची कंठातील नस असे केले. हा शब्द अनेकदा अशा गोष्टी किंवा प्रदेशासाठी वापरला जातो जो एक महत्त्वाचा भाग आहे आणि ज्यापासून वेगळे होण्याची कल्पनाही करता येऊ शकत नाही.
पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणांचा संपूर्ण जगासमोर पर्दाफाश
ओसामा बिन लादेन पाकिस्तानात राहत होता आणि अमेरिकन कारवाईत तो तिथेच मारला गेला. आजही लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना पाकिस्तानात सक्रिय आहेत. त्यांच्या संपूर्ण विधानात मुनीर यांनी पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी छावण्यांबद्दल एकही शब्द बोललेला नाही. पण, काश्मीरविषयी विधान करून नव्या वादाला तोंड फोडले.
पुन्हा पाकिस्तानची खुमखुमी आली बाहेर!
पाकिस्तानातील काही दहशतवादी संघटनांनी भारतात घुसून अनेकदा दहशतवादी हल्ले केलेले आहेत. त्यातच एप्रिल 22 रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. यात 26 लोक मारले गेले. त्यानंतर भारताने देखील प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या संस्थांवर हल्ला चढवला. यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा आहे. या सर्व प्रकरणानंतर देखील पाकिस्तान सुधारेल असे वाटले होते, परंतु, तेथील लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची खुमखुमी बाहेर आली आहे.












Click it and Unblock the Notifications