Bangladesh violence : शेख हसीनांच्या निकटवर्तीयांची धरपकड सुरु! माजी कायदा मंत्री अन् सल्लागारास अटक
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या सहका-यांविरुद्ध सुरु झालेली कारवाई चालूच आहे. बांगलादेश पोलिसांनी शेख हसीना यांचे खासगी आणि गुतंवणूक सल्लागार सलमान फजलूर रहेमान आणि माजी कायदा मंत्री अनिसुल हक यांना ताब्यात घेतले.
मागील गुरुवारी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात आंदोलनामुळे आणि कार्यवाहक सरकारच्या स्थापनेनंतर हसीना यांना पदावरुन हटवल्यानंतर हाय प्रोफाईल अवामी लीगच्या सदस्यांविरोधात पहिली मोठी कारवाई करण्यात आली, परंतू ज्या प्रकारचे फोटो बांग्लादेशातून समोर येत आहेत त्यानुसार जे सुरु आहे ते योग्य आहे असे म्हणता येणार नाही.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे त्यात असे दिसते की, सलमान एफ रहेमान आणि अनिसुल यांना ढाक्यातील सदरघाट परिसरात पळून जाताना अटक करण्यात आली. या दोघांचे हात रस्सीने बांधले आणि केवळ एक तासात त्यांच्याविरुद्ध हत्याकांडाचे आरोप करण्यात आले.
'ते' हत्येचे प्रकरण
ढाका मेट्रोपाॅलिटीन पोलिस आयुक्त मैनुल हसन यांनी अटकेबाबत दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, रहेमान आणि हक या दोघांवर १६ जुलै रोजी ढाका काॅलेज समोर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका विद्यार्थ्याच्या आणि एका ठेलेवाल्याच्या मृत्यूसंबधी आरोप आहे. या घटनेमुळे शहरात तणाव वाढला आहे.
पळून जाण्याचा प्रयत्न
ससंदेत ढाका-1 मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रहमान यांना हक यांच्यासोबत ढाक्याच्या सदरघाट परिसरातून नावेतून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आली. अधिका-यांकडून पकडले जाण्याआधीच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते असे सांगितले जात आहे.
अल्पसंख्यांक हिंदू निशाण्यावर
शेख हसीना यांच्या नेतृत्वातील सरकार 5 आॅगस्टला पडले. त्यानंतर 48 जिल्ह्यांत 278 स्थानांवर हल्ले आणि धमक्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत. बांग्लादेशात हिंदूंच्या प्रमुख संस्थांनी या घटना 'हिंदू धर्मावरील हल्ला' असल्याचे सांगितले आहे.
बांगलादेश नॅशनल हिंदू ग्रॅंड अलायंसच्या सदस्यानी नुकत्याच्या झालेल्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा उल्लेख करत म्हटले की , या देशात आमचाही हक्क आहे, आम्ही इथेच जन्मलो आहोत. पंतप्रधान हसीना यांनी देश सोडल्यानंतर, अल्पसंख्यांक हिंदुंनी अनेक दिवस हिंसेचा सामना केला. त्यांची घरे आणि दुकाने पाडण्यात आली, आगी लावण्यात आल्या, त्यामुळे हिंदुंच्या संपत्तीचे खूप नुकसान झाले.
मोहम्मद युनुस यांनी हिंदूना धैर्य बाळगण्याचे आवाहन
नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी 8 ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागाराची भूमिका निभावली. त्यांनी ढाकेश्वरी मंदिराचा दौरा केला आणि आपल्या सरकारच्या कार्यांचे मुल्याकंन करण्याआधी हिंदू समुदायाला धैर्य बाळगण्यास सांगितले. आघाडीचे प्रवक्ते आणि कार्यकारी सचिव पलाश कांति डे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितेले की, बदलत्या राजकीय चित्रामुळे हिंदू समूदायावर अत्याचार लूट, आगी लावणे, जमीनींवर कब्जा करणे, देश सोडण्यासाठी धमक्या देण्यांसारख्या घटना सतत होत आहेत.
गृह विभागाचे सल्लागार बिग्रेडियर जनरल (सेवानिवृत्त) एम सखावत हुसेन यांना हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी हे मुद्दे पुढील कॅबिनेट बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले आहे.












Click it and Unblock the Notifications