बांगलादेशात हिंदू हत्या सत्र थांबेना!, आणखी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या, 23 दिवसांत 7 बळी
Bangladesh Hindu Killing Update News : बांगलादेशातील सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बांगलादेशच्या दक्षिण भागातील फेनी जिल्ह्यातील दागनभुइयां येथे एका २८ वर्षीय हिंदू तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गत २३ दिवसांत हिंदूंच्या हत्येची ही सातवी घटना असून, यामुळे जगभरातील हिंदू समुदायात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातही त्यासंदर्भात विरोध केला जात आहे.

पूर्वनियोजित कट अन् निर्घृण हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, समीर कुमार दास (२८) हा तरुण रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आपली ऑटोरिक्षा घेऊन घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधमोहीम सुरू केली.
सोमवारी पहाटे २ वाजता जगतपूर गावातील एका शेतात समीरचा मृतदेह स्थानिक लोकांना आढळला. हल्लेखोरांनी त्याला अमानुष मारहाण करून धारदार शस्त्रांनी भोसकले होते आणि त्याची ऑटोरिक्षाही लुटून नेली होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्या केवळ लूटमारीसाठी नसून एक 'पूर्वनियोजित कट' असल्याचे दिसून येत आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.
२३ दिवसांतील हत्यांचा घटनाक्रम
बांगलादेशात हिंदू नागरिक सॉफ्ट टार्गेट बनत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे:
- १२ जानेवारी: फेनीमध्ये समीर कुमार दासची हत्या.
- ५ जानेवारी: नरसिंगदी जिल्ह्यात ४० वर्षीय दुकानदार शरत चक्रवर्ती मणि यांची धारदार शस्त्रांनी हत्या.
- ६ जानेवारी: नाओगाव जिल्ह्यात चोरीचा खोटा आरोप लावून पाठलाग केल्यामुळे मिथुन सरकार (२५) या तरुणाने कालव्यात उडी मारली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
- इतर घटना: गेल्या तीन आठवड्यांत एकूण ७ हिंदू नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे.
तुरुंगात हिंदू गायकाचा संशयास्पद मृत्यू
हिंदू सांस्कृतिक कार्यकर्ते आणि गायक प्रोलॉय चाकी यांचा राजशाही येथील तुरुंगात उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ११ जानेवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, परंतु वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. प्रोलॉय हे प्रसिद्ध सांस्कृतिक आयोजक दिवंगत लक्ष्मी दास चाकी यांचे पुत्र होते.
भारताची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय चिंता
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, "आम्ही बांगलादेशात अल्पसंख्याक आणि त्यांच्या मालमत्तांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा एक चिंताजनक नमुना पाहत आहोत. या घटनांना वैयक्तिक वैमनस्य किंवा राजकीय रंग देऊन कमी लेखले जाऊ नये, भारताने मागणी केली आहे की, बांगलादेश सरकारने कट्टरपंथी घटकांविरुद्ध कठोर पावले उचलावीत जेणेकरून अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.












Click it and Unblock the Notifications