बांगलादेश निवडणुकीपूर्वीच ढाक्यात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची एन्ट्री; युनूस सरकारचा 'प्लॅन' काय
Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दक्षिण आशियात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकांच्या अवघ्या काही दिवस आधी, जगातील सर्वात घातक दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT) चे दहशतवादी ढाक्यात दाखल झाल्याचा खळबळजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे केवळ बांगलादेशची सुरक्षाच नाही, तर भारताच्या सीमावर्ती भागांतही धोक्याची घंटा वाजली आहे.

विमान क्र. BG-342 आणि सुरक्षेतील मोठी चूक
तपास पत्रकार शाहिदुल हसन खोकन यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी 2026 रोजी पाकिस्तानच्या कराचीहून ढाका येथे पोहोचलेल्या बांगलादेश एअरलाइन्सच्या BG-342 या विमानात लष्कर-ए-तैयबाचे चार संशयित दहशतवादी होते.
वेळ : पहाटे ४:२० वाजता हे विमान ढाकाच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
पुरावे : खोकन यांनी संशयितांच्या पासपोर्टची माहिती आणि प्रवास कागदपत्रे उघड केली आहेत, ज्यावरून या प्रवाशांचे दहशतवादी संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे.
14 वर्षांनंतर हवाई सेवा सुरू अन् दहशतवाद्यांची घुसखोरी
विशेष म्हणजे, बांगलादेश आणि पाकिस्तान दरम्यानची थेट हवाई सेवा तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आधीच टीका होत होती. आता या सेवेचा वापर दहशतवादी घुसखोरीसाठी होत असल्याचे पाहून, युनूस सरकार जाणूनबुजून सुरक्षा यंत्रणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
युनूस सरकारवर 'पाकिस्तान धार्जिणे' असल्याचा शिक्का?
टीकाकारांच्या मते, युनूस सरकारने सत्तेत आल्यापासून पाकिस्तानी गुप्तचर संस्था (ISI) आणि लष्करी अधिकाऱ्यांशी जवळीक वाढवली आहे.
व्हिसा सवलती: पाकिस्तानी अधिकारी आणि लष्करी कर्मचाऱ्यांसाठी व्हिसा नियम शिथिल करण्यात आले आहेत.
तपासणीत हलगर्जी : बांगलादेशी बंदरांवर येणाऱ्या पाकिस्तानी जहाजांची आणि मालाची तपासणी कमी करण्यात आली आहे.
कट्टरपंथीयांना मोकळे रान : लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा जवळचा सहकारी इब्तिसम इलाही झहीर याने गेल्या वर्षभरात दोनदा बांगलादेशचा दौरा केला आहे.
भारताच्या सुरक्षेला थेट धोका
द डेली रिपब्लिकच्या अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबाचे नेते भारत-बांगलादेश सीमेवरील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये (उदा. राजशाही, रंगपूर, लालमोनिरहाट) सक्रिय आहेत. या भागात दिलेली भडकाऊ भाषणे आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून केलेली प्रक्षोभक विधाने पाहता, बांगलादेशचा वापर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी 'ट्रान्झिट कॉरिडॉर' म्हणून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लष्कर-ए-तैयबाचा काळा इतिहास
लष्कर-ए-तैयबा ही संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेली दहशतवादी संघटना असून २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार याच संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद आहे. आता हीच संघटना बांगलादेशच्या निवडणुकीत फेरफार करण्यासाठी किंवा हिंसाचार घडवण्यासाठी वापरली जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications