आई, बहिण वा मुलगी..! महिला दिनाला त्यांच्याकडून शिकता येतील 'या' पाच गोष्टी; किमान एक अंगिकारावी...
जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्चला साजरा केला जातो. महिलांचा सन्मान आणि त्यांचे स्त्रीत्व साजरे करण्यासाठी हा दिन जगभरात साजरा केला जातो. महिलांचा फक्त एक दिवस सन्मान करणे, एवढेच या दिवसाचे महत्त्व नाही. केवळ महिलांचा संघर्ष किंवा त्यांची कामगिरीला याला दिवशी सलाम करुन उपयोग नसतो. तर त्यांच्याकडून शिकता येणाऱ्या अनेक मौल्यवान गोष्टी आत्मसात करणे, हे या दिवसाचे महत्त्व असते. जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी महिलांमध्ये कोणते महत्त्वाचे ५ गुण असतात, हेच आपण या लेखात पाहूयात...

१. आव्हानाला संधी समजावी
आईवडीलांच्या घरात वीस वर्षे राहून महिला सासरी येते. एका परिस्थितीतून ती दुसऱ्या परिस्थीतीत सामावून जाते. आयुष्यातील प्रत्येक अडचणीला ती एक नवीन संधी म्हणून पाहते. घरातील जबाबदाऱ्या, करिअरमधील अडथळे अशा प्रत्येक परिस्थितीशी ती जुळवून घेते. प्रत्येक आव्हान महिलेला समृद्ध करते. हा धडा आपण महिला वर्गाकडून शिकला पाहिजे.
२. प्रेम आणि त्याग
आईवडिलांच्या घरात बालपण घालविल्यावर मुलगी गृहस्थाश्रमात म्हणजेच सासरी जाते. तेव्हा ती आपल्या रक्ताच्या नात्यांचा, प्रियजनांचा त्याग करते. शिवाय पुढेही माहेरी व सासरी वेगवेगळ्या परिस्थीतीशी जुळवून घेताना ती स्वतःच्या भावनांचा त्याग करते. आईचे असो, मुलीचे असो किंवा बहिणीचे असो, महिलांमधील प्रेमभावना ही निस्वार्थी असते. निःस्वार्थ प्रेम हे एक मोठे सामर्थ्य महिलांमध्ये असते. असे प्रेम व त्याग आपल्याला महिलांकडून शिकता येतो.
३. भावनिकतेत संवेदना
महिला नैसर्गिकरित्या संवेदनशील आणि भावनिक असतात. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच्या भावनांना कमकुवतपणा मानले जाते. परंतु या भावनांमध्येही मोठी ताकद असते. कुटुंब, समाज याबद्दल महिला जास्त संवेदनशिल असतात. त्या इतरांच्या भावनांना प्राधान्य देतात. महिलांमधील हिच भावनिक संवेदनशिलता प्रत्येकाने जिवनात अंगिकारली पाहिजे.
४. दृढनिश्चय- धैर्य
अवितर कष्ट आणि धैर्य हे महिलांमधील महत्त्वाचा गुण असतात. एखादे काम हातात घेतल्यावर महिला ते पूर्ण करतात. संसार सांभाळण्यापासून ते मुलांच्या संगोपनापर्यंत किंवा थेट नोकरीच्या जबाबदारीपासून ते वडिलधाऱ्यांच्या काळजीपर्यंत प्रत्येक जबाबदारी ती नेटाने व धैर्याने पूर्ण करते. महिलांमधील हा दृढनिश्चय व धैर्य हे प्रत्येकाने आपल्यात अंगिकारावे, अशी अपेक्षा आहे.
५. संतुलन साधणे
महिला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन राखतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या असोत किंवा कामाशी संबंधित उद्दीष्टे असोत, ती सर्वकाही खूप चांगल्या प्रकारे हाताळते. हा धडा आपल्याला शिकवतो की खरे यश जीवनात संतुलन राखण्यात आहे. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला वेळ देणे, आनंदी राहणे आणि संतुलित जीवन जगण्यासाठी स्वतःची काळजी घेणे हा महिलांमधील गुण प्रत्येकाने घेतला पाहिजे.












Click it and Unblock the Notifications