इंडिगोची उड्डाणे रद्द होण्याची मुळ कारणं काय? इतर कंपन्या स्थिर मग 'IndiGo' लाच का झळ बसली? वाचा
Why IndiGo Hit Hardest FDTL Rules : भारतीय हवाई क्षेत्रावर ६५ टक्क्यांहून अधिक वर्चस्व गाजवणाऱ्या इंडिगो एअरलाईनवर गेल्या आठवड्यात सुरक्षेच्या नियमांचा (FDTL) मोठा 'आर्थिक बॉम्ब' पडला. DGCA च्या बदललेल्या नियमांमुळे, ज्यावेळी इतर विमान कंपन्या व्यवस्थित होत्या, तेव्हा इंडिगोला मात्र आपल्या शेकडो फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. विमानतळे प्रवाशांनी तुडुंब भरली, तिकीटांचे दर गगनाला भिडले आणि देशभरात प्रवाशांचे मोठे हाल झाले. कमीतकमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम काढण्याच्या इंडिगोच्या कठोर धोरणाला, वैमानिकांसाठी लागू झालेल्या विश्रांतीच्या नवीन नियमांचा मोठा फटका कसा बसला, ज्यामुळे एकाच कंपनीचे संपूर्ण नेटवर्क कोलमडले, याचा हा आढावा.

DGCA च्या नियमांमुळे इंडिगोलाच 'बॅड लँडिंग' का?
गेल्या आठवड्यात इंडिगोच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशातील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दररोज शेकडो सेवा रद्द झाल्या, विमानतळे जाम झाली आणि तिकीट दरांनी उसळी घेतली. 'वनइंडिया इंग्लिश'नुसार, याचे मूळ कारण DGCA (नागरी उड्डाण महासंचालनालय) ने पायलट थकवा कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांशी जुळवून घेण्यासाठी लागू केलेले कठोर 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' (FDTL) नियम आहेत.
नव्या नियमांचा 'शॉक' आणि वेळापत्रकाची घडी
या सुधारित नियमांमुळे इंडिगोचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले.
वैमानिकांच्या साप्ताहिक विश्रांतीचा वेळ ३६ तासांवरून वाढवून ४८ तास करण्यात आला, याचा फटका इंडिगोला बसला.
रात्रीच्या कामावर बंधनं हा एक नियम महत्वाचा ठरला. रात्रीच्या लँडिंगची संख्या सहावरून दोनवर आणण्यात आली, तसेच रात्रीची ड्युटी १० तासांपेक्षा जास्त ठेवण्यास मनाई करण्यात आली, इंडिगोच्या धोरणाला यामुळे फटका बसला.
..का बसला इंडियोच्या धोरणाला फटका?
इंडिगोचे मॉडेल हे रात्रीच्या नियमित उड्डाणांवर आणि विमानांना जलद गतीने पुन्हा उड्डाणासाठी तयार करण्यावर अवलंबून होते. नवीन नियमांमुळे पायलट उपलब्धतेत मोठी घट झाली, ज्यामुळे कंपनीच्या 'टाईट शेड्युल'ची घडी पूर्णपणे विस्कटली आणि फ्लाईट्स रद्द करण्याची वेळ आली.
'लीन-स्टाफिंग' धोरण ठरले घातक
इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपले कामकाज व्यवस्थित ठेवले, पण इंडिगोला सर्वाधिक फटका बसला, याचे कारण म्हणजे पायलटचा तुटवडा हा होय. कंपनीने नवीन FDTL नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त वैमानिकांची संख्या पुरेशी विचारात घेतली नाही असे बोलले जाते. अहवालानुसार, गरजेपेक्षा कमी पायलट उपलब्ध असल्याने, जेव्हा जास्त विश्रांतीची वेळ आली, तेव्हा 'क्रू' मेंबरचा अतिरिक्त साठा शून्य झाला.
कमी कर्मचारी संख्येत जास्त वापर?
इंडिगोचे धोरण कमीतकमी कर्मचारी ठेवून, विमानांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर आधारित होते. या 'बफर-डेफिसिट' मॉडेलमुळे नियमांमध्ये छोटासा बदल झाला तरी त्याचे रूपांतर मोठ्या संकटात झाले. इंडिगोचा बाजारात ६५% हिस्सा असल्याने, त्यांचे ऑपरेशन थांबताच त्याचा परिणाम देशभर पसरला आणि विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
नियमांचे लाल सिग्नल आणि दर नियंत्रण
इंडिगोच्या फ्लाईट्स रद्द झाल्यानंतर प्रवाशांचा संताप वाढला आणि गोंधळानंतर DGCA आणि सरकारने कठोर भूमिका घेतली. DGCA ने इंडिगोचे सीईओ आणि अकाउंटेबल मॅनेजर यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावली आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी सविस्तर आराखडा मागवला. उड्डाणे रद्द झाल्यामुळे दिल्ली-बेंगळूरु यांसारख्या मार्गांवर तिकीट दर ₹८०,००० पर्यंत पोहोचले होते. सरकारने त्वरित हस्तक्षेप करत निवडक मार्गांवर दरांची कमाल मर्यादा लागू केली.
इंडिगोने १० ते १५ डिसेंबरपर्यंत कामकाज सामान्य होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात कशी स्थिती असेल हे लवकरच कळेल.












Click it and Unblock the Notifications